Menu

देश
‘मविआ’च्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

nobanner

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सोमवार पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आगामी नवी मुंबई महानगर पालिका (एनएमएमसी) निवडणुकीवर काही प्रमाणात परिणाम होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘एपीएमसी’च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कांदा बटाटा, लसूण, फळे, धान्य, मसाला, माथाडी आणि भाजी बाजारात निवडून आलेले सहा संचालक हे येथील मतदार असून त्यांना मतदान करणारे मतदारही नवी मुंबई पालिका क्षेत्रातील व्यापारी आहेत. त्यामुळे ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

नवी मुंबई पालिकेची एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या दोन महिने अगोदर राज्यातील एक शिखर समिती असलेल्या एपीएमसीची निवडणूक होऊन त्यात १८ शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी निवडून आले आहेत. यात ‘मविआ’च्या घटक पक्षातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे संचालक जास्त आहेत. त्यामुळे पाच वर्षांच्या ‘एपीएमसी’च्या संचालक निवडणुकीत ‘मविआ’चे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीतील निकालाचा सर्वाधिक फायदा हा एप्रिल महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या लक्षवधी निवडणुकीत मविआला होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एपीएमसीच्या संचालक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे पंधरा हजार व्यापारी व माथाडी कामगार हे नवी मुंबई पालिकेचे गेली तीस वर्षे मतदार आहेत. यात माथाडी संचालकपदाची बिनविरोध निवडणूक झाल्याने मतदानाचा प्रश्न आला नाही. नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, तुर्भे, नेरुळ या भागात सुमारे ७० हजार माथाडी कामगार असून ही कुटुंबातील मतदारांची संख्या दोन लाखांच्या वर आहे. कोपरखैरणे व ऐरोलीतील अनेक नगरसेवक हे माथाडी कामगारांच्या मतदानावरच पालिका सभागृहाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे एपीएमसी संचालक मंडळाच्या निवडणुकीत झालेला सहा संचालकांचा विजय हा पालिका निवडणुकीतील व्यापारी व माथाडीबहुल प्रभागामधील इच्छुक नगरसेवकांचे मनोधैर्य वाढविणार आहे. एपीएमसी संचालक मंडळाच्या दोन बाजारांतील संचालकांचा कल हा भाजपला मानणारा असला तरी राज्यातील सरकारच्या सोबत राहण्याकडे या संचालकांचा मानस जास्त प्रमाणात असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकीवरून दिसून येत आहे. एपीएमसी संचालक मंडळाच्या या निकालाचा सर्वाधिक फायदा ‘मविआ’ येत्या काळात उचलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संचालक मंडळाच्या विजयानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.