Menu

देश
राजकीय रंगात करोनाभंग

nobanner

करोना विषाणू’च्या फैलावाच्या धास्तीने राज्यातील सर्व राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. याच वेळी नवी मुंबईत होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीचा रंग ‘करोना’मुळे भंग होण्याची स्थिती ओढावली आहे. गेले काही दिवस निवडणुका जाहीर होण्याआधीच प्रचारात आघाडी घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या अनेक इच्छुकांच्या उत्साहाचा जोर ओसरू लागला आहे.

गर्दीची सर्व प्रकारची ठिकाणे टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका प्रशासनाने सोमवारी निवडणूक कार्यक्रमाचा आढावा घेतला.

नवी मुंबई पालिका सभागृहाची ८ मे रोजी मुदत संपत आहे. त्यापूर्वी निवडणुका घेण्याची सर्व तयारी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने पालिकेने केलेली आहे. ९ मार्चपासून प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोमवारी १६ मार्चपर्यंत या मतदारयाद्यांवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. सोमवारी एकूण २ हजार ५३८ हरकती घेण्यात आल्या आहेत. या हरकती आणि सूचनांचीही दखल घेऊन पालिका २३ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला हा निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे. मात्र, पालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीत बराच गोंधळ असल्याचे आढळून आले आहे. एका प्रभागातील नावे जवळच्या दुसऱ्या प्रभागात नोंद झाल्याने हा वाद चिघळला आहे. या मतदार याद्यांच्या विरोधात हरकती व सूचना करणाऱ्यांची संख्या त्यामुळे वाढली आहे. या हरकती व सूचनांची दखल घेण्यासाठी पालिकेला वेळ लागणार आहे. याच काळात करोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.

नवी मुंबईत दोन रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली असून सर्वत्र सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक आरोग्यापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या नाहीत, असा एक मतप्रवाह अधिकारी वर्गात आहे. नवी मुंबईत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ते सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्ते गर्दी करीत आहेत. शहरात अघोषित संचारबंदी असल्याचे वातावरण असल्याने इच्छुक उमेदवारांच्या जोरावर ओल्या पाटर्य़ाना भर आला आहे. मतदारांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी यासाठी इच्छुक उमेदवार समाजमाध्यमांचा पुरेपूर उपयोग करीत आहे. राज्य निवडणूक आयोग यासंदर्भात निर्णय घेईल, असे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

‘निवडणूक पुढे ढकलावी’

दोन रुग्ण आढळल्याने करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या नवी मुंबई पालिकेने समांतर पातळीवर निवडणूक कार्यक्रमही राबविला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाशिवाय पालिका हा कार्यक्रम थांबवू शकणार नाही. त्यामुळे सोमवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. २३ मार्चपर्यंत हरकती व सूचनांसह मतदार यादी प्रसिद्ध करण्याची माहिती या वेळी घेण्यात आली. मात्र, ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, असा मतप्रवाह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तर आयुक्तच प्रशासक..

पालिका सभागृहाची मुदत ८ मे रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात यावे अशी निवडणूक आयोगाची रचना आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात आचारसंहिता जाहीर करण्याची तयारी करण्यात आली होती, मात्र याच काळात करोना विषाणूचे संकट देश व राज्यावर आले आहे. त्यामुळे आरोग्यापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या नाहीत, असे मत कॅबिनेट मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय आपत्ती जाहीर झालेला करोना लवकर आटोक्यात आला नाही, तर ८ मे नंतर आयुक्तांना प्रशासक म्हणून नेमून पुढील कालावधीसाठी कामकाज केले जाणार आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.