Menu

देश
सेव्हन हिल्ससह खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरणाची सुविधा उपलब्ध

nobanner

करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून उपनगरीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष पालिकेने तयार केले आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयातील सुविधांचा शुक्रवारी पालिका आयुक्तांनी आढावा घेतला असून येथेही लवकरच विलगीकरण कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली.

कस्तुरबा रुग्णालयात सध्या ७८ खाटा उपलब्ध असून १०० पर्यंत खाटा वाढविण्याची क्षमता आहे. संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय (२०), कुर्ला भाभा (१०), वांद्रे भाभा (१०), राजावाडी (२०), वडाळ्याचे मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालय (५०) आणि भायखळा येथील बाबासाहेब मध्य रेल्वे रुग्णालय (३०) अशा एकत्रित २१८ खाटा पालिकेने उपलब्ध केलेल्या आहेत. याशिवाय मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातही १५ खाटा कार्यरत झालेल्या आहेत.

अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाची शुक्रवारी पालिका आयुक्तांनी पाहणी केली. बाधित भागातून आलेल्या ३०० रुग्णांना अलग ठेवण्याची सुविधा येथे केली जाणार आहे.

याव्यतिरिक्त ३० खाटांचा विलगीकरण कक्षही तयार केला आहे, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

घाबरून न जाण्याचे यंत्रणेचे आवाहन

पुणे : राज्यात मुंबई तसेच पुणे आणि नागपूर विमानतळांवर शुक्रवापर्यंत तब्बल एक लाख ६० हजार १७५ प्रवासी तपासण्यात आले. त्यांपैकी ८१८ प्रवासी महाराष्ट्रात आले असून त्यातील केवळ १८ प्रवाशांना करोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. करोना संसर्ग वेगाने पसरणारा असला, तरी राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

विमानतळांवर दाखल झालेल्या लाखो प्रवाशांपैकी ८१८ प्रवासी विविध बाधित देशांमधून आलेले असून ते महाराष्ट्रात स्थिरावले आहेत. १८ जानेवारी पासून राज्यात आलेल्या आणि ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळलेल्या ५३२ व्यक्तींना राज्यातील विविध विलगीकरण कक्षांमध्ये वेळोवेळी भरती करण्यात आले. त्यांपैकी ४४१ व्यक्तींच्या वैद्यकीय नमुना तपासणीत करोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले. पुणे शहरातील नायडू रुग्णालयात शुक्रवापर्यंत २३७ रुग्ण विलगीकरणासाठी दाखल झाले. त्या सर्वाचे वैद्यकीय नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे तपासण्यात आले. २०५ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आहेत. दहा रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. २५ रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ३३ रुग्ण नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात भरती आहेत, मात्र करोना संसर्ग असलेल्या रुग्णांसह सर्वाची तब्येत स्थिर असल्याने काळजीचे कारण नाही, असे सांगण्यात आले आहे.

परीक्षांबाबत निर्णय नंतर

करोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शाळांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे; परंतु परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तू

केंद्र सरकारने शुक्रवारी २ प्लाय, ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि सॅनिटायझर यांना अत्यावश्यक वस्तू म्हणून जाहीर केले. त्यांचा काळाबाजार आणि तुटवडा लक्षात घेऊन ३० जूनपर्यंत या वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत असेल, असे केंद्र सरकारने जाहीर केले.