श्रावणी सोमवारवरही कोरोनाचा परिणाम; मार्लेश्वरला दर्शनबंदी असल्याने महादेव भक्त नाराज
- 219 Views
- July 15, 2020
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on श्रावणी सोमवारवरही कोरोनाचा परिणाम; मार्लेश्वरला दर्शनबंदी असल्याने महादेव भक्त नाराज
- Edit
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक सण साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. अगदी गणेशोत्सवावरही कोरोनामुळे झालेला परिणाम सर्वांना माहितच आहे. पण, आता चार दिवसांवर आलेल्या श्रावणी सोमवारवर देखील कोरोनाचा परिणाम दिसून येणार आहे. श्रावणातील सोमवार म्हटलं की, भाविक मोठ्या प्रमाणात शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. पण, यंदा मात्र भाविकांना त्याठिकाणी जाता येणार नाही आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान. महादेवाचं स्वयंभू असं तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वरमध्ये श्रावणात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. पण, यंदा मात्र भाविकांना या ठिकाणी येता येणार नाही. कोरोनामुळे देशातील देवस्थाने बंद आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे देवस्थान भक्तांसाठी बंद आहे. या ठिकाणी दररोज शंभू महादेवाची पूजा आणि आरती मात्र नित्य होत आहे. पण, भाविकांची होणारी गर्दी मात्र थांबली आहे. जिल्हाधिकारी आणि न्यास याबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हे देवस्थान भक्तांना दर्शनासाठी खुलं करता येणार नसल्याची माहिती तिथल्या पुजाऱ्यांनी दिली आहे. शिवाय या ठिकाणी असलेल्या दुकानदारांवर देखील कोरोनाचा परिणाम होताना दिसत आहे.