देश
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी 30 सप्टेंबरला निर्णय; आडवाणी, जोशींसह अन्य आरोपींना हजर राहण्याचे आदेश
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय 30 सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
सीबीआयचे वकील ललित सिंह यांनी सांगितले, की फिर्यादी आणि बचाव पक्ष दोन्ही पक्षांची सुनावणी 1 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर विशेष न्यायमूर्तींनी निकाल लिहणे सुरु केलं. सीबीआयने या प्रकरणात 351 साक्षीदार आणि 600 दस्तावेज पुराव्याच्या स्वरुपात न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
सहा डिसेंबर 1992 ला वादग्रस्त रचना विध्वंस प्रकरणात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजप नेता विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी रितम्बरा यांच्यासह एकूण 32 आरोपी आहेत.
यापूर्वी सुनावणी दरम्यान सर्व आरोपींना ऑनलाईन हजर केले होते. बाबरी विध्वंस प्रकरणातील कोर्टाचा निर्णय 28 वर्षानंतर येत आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने संबंधित खटला 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे विशेष न्यायालयाचा पूर्ण प्रयत्न असा आहे की या प्रकरणाचा निकाल मर्यादीत वेळेत सुनावावा.