देश
Cyclone Tauktae Live Updates: तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्र किनारी धडकणार नाही; उद्या मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई:तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीपासून हे वादळ बरेच दूर असून आज रात्री किंवा उद्या या वादळाचा प्रभाव किनारपट्टी भागात जाणवू शकतो, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील किनारपट्टी भागातील जिल्ह्यांत जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
– मुलुंड कोविड सेंटरमधून दुपारी २० ते २५ रुग्णांना मुलुंड मिठागर कोविड सेंटरमध्ये तर पाच रुग्णांना मुलुंड जकात नाका येथे नवीन कोविड सेंटरमध्ये हलवले. मुलुंड कोविड सेंटर आणि एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली माहिती.
– रत्नागिरी शहर परिसरात गडगडाटासह जोरदार पावसाला सुरूवात. काही भागात वीजप्रवाह खंडित.
– केरळ-कर्नाटकदरम्यान चक्रीवादळादरम्यान समुद्रात मच्छिमार नौका अकडली होती. रात्रीच्या अंधारात खवळलेल्या समुद्रात तटरक्षक दलाने या नौकेतील मच्छिमारांचा बचाव करून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणले. वरळीतील समुद्री बचाव समन्वय केंद्राद्वारे हे कार्य करण्यात आले.
– तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्र किनारी धडकणार नाही. प्रादेशिक हवामान विभागाने दिली माहिती.
– चक्रीवादळ सध्या गोवा किनाऱ्यापासून अरबी समुद्रात ३५० किलोमीटर दूर. तिथून गुजरातच्या दिशेने सरकणार.
– वादळाचा प्रभाव मुंबईसह किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांत जाणवणार. उद्या वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता..
– बीकेसी कोविड सेंटर येथे २० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालिकेकडून आदेश आल्यास रुग्ण हलवणार. डाॅ. राजेश डेरे यांनी दिली माहिती.
– सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र खवळला. किनारपट्टीवार उंच लाटांच्या धडका.
– सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पावसाळी वातावरण. येत्या दोन तासांत जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.
– चक्रीवादळाचा प्रवास वेगाने उत्तरेच्या दिशेने सुरू. महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता कमी. मात्र समुद्र खवळलेला राहणार.