देश
भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड पालिकेत ACBचा छापा; ‘ती’ बैठक सुरू होताच
भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट महापालिका भवनातील स्थायी समिती कक्षात छापा टाकल्याने सगळेच हादरले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची कारवाई झाली आहे. ( ACB Raids Pimpri Chinchwad Municipal Corporation )
पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयात आज ‘एसीबी’ ने धडक दिली. स्थायी समितीची बैठक सुरू होताच छापा टाकण्यात आला. यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असताना ही कारवाई झाल्याने याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायक कक्षात सध्या ‘एसीबी’चे अधिकारी ठाण मांडून असून तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षामध्येही एसीबीचे अधिकारी झडती घेणार आहेत. भाजप स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह समितीचे सदस्य व नगरसेवक या कारवाईने हादरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एसीबीचे पथक पिंपरी चिंचवड पालिकेत दाखल झाले. कंत्राटदाराकडून लाच घेतल्याच्या प्रकरणात हा छापा टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांना विचारले असता सध्या कारवाई सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिक तपशील त्यांनी दिला नाही.