Menu

ममता दीदींचा महाराष्ट्र दौरा निश्चित; उद्धव ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट

nobanner

उद्धव ठाकरे, शरद पवार भेटीसाठी लवकरच ममता मुंबईत दाखल होणार

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नुकताच तीन दिवसांचा दिल्ली दौरा केल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांची नजर महाराष्ट्राकडेही लागलीय. येत्या ३० नोव्हेंबर रोजी ममता बॅनर्जी देशा
ची आर्थिक राजधानी मुंबईत दाखल होणार आहेत. आपल्या या दौऱ्यात त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत ममता बॅनर्जी महाराष्ट्रात असतील.

आपल्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेसमधील काही नाराज नेत्यांना ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये खेचून आणलंय. तसंच आपल्या दिल्ली दौऱ्यात ममतांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही भेट घेतली. सुब्रमण्यम स्वामी हे भाजपमधील असंतुष्ट आणि भाजप नेतृत्वावर थेट टीका करण्यासाठी ओळखले जातात. बुधवारी या दोन्ही नेत्यांची दिल्लीस्थित साऊथ एव्हेन्यूमध्ये जवळपास २०-२५ मिनिटांची भेट झाली.

या भेटीनंतर, आपला तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केलं.

यानंतर ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसीचा दौराही करणार आहेत.

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ‘अखिलेश यादव यांना आमच्या मदतीची गरज लागली तर आम्ही ही मदत देण्यासाठी तयार आहोत’ असं वक्तव्यही दीदींनी यावेळी केलंय.



Translate »