Bipin Rawat: बिपीन रावत यांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; दोन्ही लेकी धीर एकवटून…

हरिद्वार: संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अस्थी आज हरिद्वार येथे गंगेत विसर्जीत करण्यात आल्या. रावत यांच्या दोन्ही मुलींनी विधीवत अस्थीविसर्जन केले.
‘बिपीन रावत यांच्या निधनाने देश दु:खात, मात्र…’; PM मोदींनी दिला ‘हा’ शब्द
तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि अन्य ११ अधिकाऱ्यांचे निधन झाले. रावत व त्यांच्या पत्नीवर शुक्रवारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बिपीन रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांना १७ तोफांची सलामी देण्यात आली. रावत यांना कृतिका आणि तारिणी अशा दोन मुली असून मुलींनीच त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. या दोघी धीर एकवटून या प्रसंगाला सामोऱ्या जात आहेत. आपले कर्तव्य निभावत आहेत. अंत्यसंस्कारानंतर आज सकाळीच कृतिका आणि तारिणी आईवडिलांच्या अस्थी घेऊन हरिद्वार येथे दाखल झाल्या. त्यांनी दुपारी गंगा नदीत अस्थींचे विसर्जन केले. याबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही माहिती दिली आहे. ‘दिवंगत जनरल बिपीन रावत व त्यांची धर्मपत्नी मधुलिका यांच्या अस्थी सैन्य सन्मान व विधीपूर्वक हरिद्वार येथील व्हीआयपी घाट येथे गंगेत विसर्जित करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आईवडिलांना फुले अर्पण करून नमन केलं. संपूर्ण उत्तराखंड या संकट समयी रावत कुटुंबीयांसोबत आहे’, अशा भावना मुख्यमंत्री धामी यांनी व्यक्त केल्या.