अक्षय कुमारची तंबाखूच्या जाहिरातीतून माघार, माफी मागत म्हटलं…
- 202 Views
- April 21, 2022
- By admin
- in india, Maharashtra
- Comments Off on अक्षय कुमारची तंबाखूच्या जाहिरातीतून माघार, माफी मागत म्हटलं…
- Edit

अभिनेता अक्षय कुमारने तंबाखूच्या जाहिरातीतून माघार घेतली आहे. ट्विटरवरून त्याने ही घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विमलच्या जाहिरातीत अक्षय कुमार दिसल्यावर चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडिमार केला होता.
आपल्या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय, “मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या प्रतिक्रियांचा माझ्यावर परिणाम झाला आहे. मी तंबाखूचे समर्थन करत नाही आणि करणारही नाही.
“विमल इलायची बरोबर केलेल्या जाहिरातीनंतर तुम्ही व्यक्त केलेल्या तुमच्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे नम्रतेने मी माझे पाऊल मागे घेतो. मी ठरवलं आहे की जाहिरातीसाठी घेतलेले सर्व मानधन मी धर्मादाय संस्थेला देईन.”
“मात्र माझ्या माफीनाम्यानंतरही, माझ्या कराराची कायदेशीर मर्यादा पूर्ण होईपर्यंत विमल इलायची हा तंबाखू ब्रँड या जाहिरातीचा वापर सुरू ठेवेल. पण मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी माझ्या पुढील जाहिराती काळजीपूर्वक निवडेन. त्या बदल्यात मला तुम्हा सर्वांकडून तुमचे प्रेम आणि शुभेच्छा मिळतील, अशी अपेक्षा आहे,” असंही त्याने लिहिलंय.
शाहरुख खान आणि अजय देवगणनंतर आता अक्षयकुमार विमल इलायचीच्या जाहिरातीत झळकल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. सिगारेट सोडण्यास प्रोत्साहन देणारा खिलाडी अक्षय आता गुटख्याच्या ब्रँडची जाहिरात करतो हे त्याच्या चाहत्यांना आवडलेलं नाही.