Menu

‘बाळासाहेबांनी राणा दाम्पत्याला लाथा घातल्या असत्या’, विनायक राऊतांची टीका

New Project (43) (19)
nobanner

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यापासून शिवसैनिक चांगेलच आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्य शुक्रवारी मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करणार होते. पण आक्रमक झालेले शिवसैनिक आणि पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमुळे त्यांना मातोश्रीवर जाता आलं नाही. यानंतर राणा दाम्पत्यानी पत्रकार परिषद घेत शनिवारी सकाळी नऊ वाजता आपण मातोश्रीवर जाणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला होता.

पण तारीख आणि वेळ दोन्ही उलटून गेली आहे, तरीही राणा दाम्पत्य अद्याप मातोश्रीवर पोहोचू शकलं नाही. शेकडो शिवसैनिकांनी रात्रभर मातोश्रीबाहेर जागता पहारा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली आहे. “शिवसेनेसमोर राणा दांपत्य म्हणजे किस झाड कि पत्ती”, अशा शब्दांत विनायक राऊतांनी राणा दाम्पत्यावर तोंडसुख घेतलं आहे.

“राणा दाम्पत्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. पण त्यांच्या आडून भारतीय जनता पक्षाची लोकं जे काही माकडचाळे करत आहेत, त्यांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे. आज सकाळी नऊ वाजता ते मातोश्रीवर येणार होते. पण त्यांच्या आयुष्यात नऊ कधीही वाजणार नाहीत”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

‘बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी शंभर वेळा हनुमान चालिसा वाचायला लावली असती,’ या राणा यांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता, विनायक राऊत म्हणाले की, “बाळासाहेब असते तर त्यांनी यांना लाथा घातल्या असत्या. उद्धव ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही. खार वेस्टमध्ये राणा दाम्पत्य ज्या घरात राहतात, ते घर एका गँगस्टरचं आहेत. भाजपा आणि संबंधित गँगस्टरची तळी उचलण्यात राणा दाम्पत्याचं आयुष्य गेलं आहे.”

दुसरीकडे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी देखील राणा दाम्पत्यावर तोफ डागली आहे. “ज्यांनी वारंवार मातोश्रीला आव्हानं दिली, त्यांनी मातोश्रीबाहेर येऊन दाखवावं. त्यांनी दिलेली तारीख आणि वेळही निघून गेली आहे. आम्ही अजूनही त्यांची वाट पाहातोय. हिंमत असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं. पोकळ धमक्या देण्याआधी उद्धव ठाकरे कोण आहेत? हे त्यांना चांगलंच माहीत होतं. त्यामुळे त्यांनी नौटंकी बंद करावी आणि दम असेल तर मातोश्रीबाहेर येऊन दाखवावं,” असं आव्हान वरुण सरदेसाई यांनी दिलं आहे.



Translate »