मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना करारा जबाब देणार, अशी केलेय तयारी

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 मे या दिवशी मुंबईत सभा होणार आहे. ( Uddhav Thackeray Sabha) राज्यात विरोधकांच्या कुरघोड्या, टीका यांना मुख्यमंत्री बीकेसीतल्या भव्य सभेत प्रत्युत्तर देणार आहेत. या सभेच्या आधी शनिवारी ते 30 एप्रिलला राज्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा यावरुन मनसे- भाजपने वातावरण तापवले आहे. त्याचसोबत किरीट सोमय्या यांचेही आरोपसत्र सुरुच आहे. नवनीत आणि रवी राणा दाम्पत्यानेही थेट शिवसेनेला आव्हान दिले आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1 मे या दिवशी मुंबईत पोलखोल सभा घेणार आहेत. तर मनसे प्रमुख राज ठाकरे 3 मे या दिवशी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या सगळ्या कारवायांना मुख्यमंत्री 14 मे या दिवशी जाहीर सभेतून प्रत्युत्तर देणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मुंबई पालिका डोळ्यासमोर ठेवून भाजप अधिक आक्रमक झाली आहे. मनसेही आक्रमक होत आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजप आणि मनसे छुपी युती दिसून येत आहे. त्यातच विरोधकांना हातीशी घेत भाजप शिवसेनेविरोधात आघाडी उघडलेली दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राणा दाम्पत्याला पाठिंबा दिला आहे.