‘राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय’ : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis In Bhiwandi : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते. यांना गुदगुल्या होत होत्या. आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांचा घाव वर्मी लागतोय. भारतीय जनता पार्टीला कोणालाही समोर करायची गरज नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते भिवंडी हायवे दिवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या कै मनीबाई मोरेश्वर पाटील बलोद्यान लोकार्पण प्रसंगी आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे हे भाजपच्या हातचे बाहुले आहेत असे वक्तव्य केले होते. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता ते त्यांनी म्हटलं की, राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या आता सत्य बोलतात खाजवायला होतंय.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. आम्ही पोलखोल यात्रा सुरू केली आहे. दररोज पोलखोल करतोय. त्यामुळे सरकार आणि सरकारमधील पक्ष व्यथित झाले आहेत. त्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत. पण आम्ही घाबरणार नाहीत. पोलखोल आम्ही रोजच करत आहोत. ज्यांची रोज पोलखोल होत आहे, ते अस्वस्थ होऊन आमच्या रथावर हल्ले करत आहेत. त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज पोलखोल करत राहणार असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.