ENG vs NZ: न्यूझीलंडच्या संघाने अनोख्या पद्धतीने केली आपल्या फलंदाजाच्या कृतीची भरपाई
क्रिकेटचा सामना सुरू असताना सर्वांचे लक्ष मैदान खेळणाऱ्या खेळाडूंकडे असते. मात्र, त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये अनेक मजेशीर घटना घडत असतात. मैदानात चित्रिकरणासाठी उपस्थित असेलेल्या छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांमध्ये कधी-कधी अशा घटना कैद होतात. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात अशीच एक घटना घडली. न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल फलंदाजी करत असताना त्याने मारलेला एक उत्तुंग षटकार प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. या षटकारामुळे न्यूझीलंडच्या धावसंख्येत वाढ तर झाली मात्र, नंतर संघाला त्याची भरपाई देखील करावी लागली.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून यष्टिरक्षक टॉम ब्लंडेल ६७ आणि डेरिल मिशेल ८१ धावांवर नाबाद आहेत. मिचेलने आपल्या अर्धशकीय खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या एका षटकाराचा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये बसलेल्या चाहतीच्या हातातील बीअर ग्लासमध्ये जाऊन पडला. बीअर सांडल्यामुळे इंग्लंडच्या या चाहती नाराज झाली. डेरिल मिशेलच्या षटकाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.