देश
महागाईविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; पोलिसांचा कडक बंदोबस्त
Congress Protest in Mumbai : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या मोर्चा आधी तगडी सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. तर पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर प्रत्येक गाडीचं चेकिंग करण्यात येत आहे. बेस्टच्या बससेवरही करडी नजर आहे. तर राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदींसह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी या नेत्यांना विधानभवनातच अडवले. काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी रोखल्याने मोठा गोंधळ सुरु झाला. मात्र, पोलिसांनी सगळ्यांचीच धरपकड केली. महागाईविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन सुरु आहे.
मुंबईत हँगिंग गार्डन ते राजभवन असा काँग्रेसचा मोर्चा होता. गिरगाव चौपाटी येथे मोर्चा रोखत पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत होता. काँग्रेस मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महागाईविरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. महागाईविरोधात काँग्रेसने देशभरात एल्गार पुकारला असून, राहुल गांधींच्या नेतृत्वात देशभरात आंदोलन सुरु आहे. यावेळी केंद्र सरकारविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर महागाईवरून हल्लाबोल केला. देशात लोकशाही उरलेली नाहीये, काँग्रेसनं 75 वर्षांत कमावलं, ते भाजपने 8 वर्षात गमावल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. सरकारविरोधात आवाज उठवल्यावर अटक होते, देशात ईडीची दहशत दाखवली जात असून, हुकूमशाही सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटले. देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून, महागाईवर अर्थमंत्री का बोलत नाहीत?, असाही सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.