Menu

देश
त्र्यंबकेश्वरहून येणाऱ्या बसचे टायर फुटले, डिव्हायडर तोडून दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू

nobanner

त्र्यंबकेश्वर येथून नाशिककडे येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटल्याने बसचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. खाजगी प्रवासी बस डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली आणि तिने दोन दुचाकींना धडकली. त्यानंतर बस झाडावर जाऊन आदळली. ही बस दुचाकीस्वारासाठी दुर्दैवानं मृत्यूची बस ठरली आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. या बसने चिरडलेल्या दुचाकीवरील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अनेक माहिती अशी की, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेळगाव ढगा परिसरात खासगी वाहतूक करणारी बस सकाळच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून देवदर्शन करून नाशिककडे निघाली होती. बेळगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कूलजवळ आली त्यावेळी दुर्दैवाने भाविकांच्या बसचे टायर फुटले.

यावेळी बस चालकाकडून बस आनियंत्रित झाल्याने ती डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. यावेळी नाशिकहून त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना बसने जोरदार धडक दिली व बस झाडावर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुचाकीस्वाराच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुचाकीस्वारासह देवदर्शनासाठी आलेल्या बसमधील प्रवाशांसाठी आजची सकाळ दुर्दैवी ठरली. बसमधील काही प्रवासी देखील जखमी झाले आहेत.

दरम्यान नाशिकमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले असून गेल्या तीन दिवसात भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. इगतपुरी येथे चारचाकी कारचे टायर फुटल्याने एकाच कुटुंबातील चार जण तर वनी सापुतारा महामार्गावर झालेल्या बस आणि दुचाकीच्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण मृत्युमुखी पडले होते. तर आज सकाळी खाजगी बसने धडक दिलेल्या दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे.