देश
Ashadhi Wari : नाथांच्या पालखीला वीस दिवस पूर्ण, 299 किमीचा पायी प्रवास, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 348 किमीचा पायी प्रवास
‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, ज्ञानेश्वर माउली तुकाराम, असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. टाळ मृदूंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यातील कोरेगाव येथे मुक्कामी होती. कालच्या कोरेगाव शहरातील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी वाकवड मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून आज उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरात मुक्कामी असणार आहे.
गेल्या वीस दिवसांपासून पंढरपुरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. आतापर्यंत अनेक दिंड्यानी पंधरा दिवसांहुन अधिक दिवसांचा प्रवास करत मजल दर मजल करत पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू आहे. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा विसावा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात असून कर्जत जवळील कोरेगाव येथील मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल वाकवड गावी मुक्कामी होती. आज पालखीचा विसावा दिवस असून आज पालखीने उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहराकडे मार्गक्रमण केले आहे. आज भूम गावातील चौंडेश्वेरी देवी व्यापारी मंडळाकडून दुपारचे जेवण दिले जाणार असून त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच शहरातील रवींद्र हायस्कुलला रात्रीचा विसावा घेणार आहे.
आज पालख्यांचा मुक्काम कुठे?
संत निवृत्तीनाथांची पालखी आज सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर पोहचली असून सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. कोरेगावला मुक्कामी असलेली संत निवृत्तीनाथांची पालखी पायी मार्गाने कोरेगावहून वीस किलोमीटरवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातीलरावगावला मुक्कामाला पोहचणार आहे. अंबीजळगाव, शेगुडमार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर संत निवृत्तीनाथांच्या पायी दिंडी पालखीने आतापर्यंत 299 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. मुक्ताईनगर येथून पायी मार्गाने निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी पायी मार्गाने भूमला मुक्कामी असणार आहे. आतापर्यत मुक्ताईनगर पासून पालखीने तब्बल 348 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.