अपराध समाचार
Pune Crime: चाकणमध्ये मध्यरात्री धुमश्चक्री, दरोडेखोराने डीसीपीच्या छातीवर कोयता चालवला, एपीआयच्या खांद्यावर वार
- 83 Views
- March 03, 2025
- By crimesoch
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on Pune Crime: चाकणमध्ये मध्यरात्री धुमश्चक्री, दरोडेखोराने डीसीपीच्या छातीवर कोयता चालवला, एपीआयच्या खांद्यावर वार
- Edit
दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर (Pimpri-Chinchwad Police) हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बचावासाठी पोलीस उपायुक्तांनीसुद्धा गोळीबार केल्यानं एक आरोपी जखमी झाला. यात चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झालेत. चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली.
गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, तेव्हा पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र याच टोळीतील आणखी दोघे काल पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार अशी खबर पोलिसांना मिळाली होती. मग डीसीपी पवारांनी एपीआय जराडसह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहचले. त्यावेळी मंदिर परिसरात दोघे दबा धरुन बसल्याचं लक्षात आलं. मग त्या परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री सव्वा बाराच्या सुमारास स्वतः डीसीपी आणि एपीआय दोन दरोडेखोरांच्या दिशेने निघाले, या दोघांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र दोघांनी पळून जाण्याचं धाडस स्वीकारलं, तेव्हा डीसीपी आणि एपीआय पुढं सरसावले.
डीसीपी पवार, एपीआय जराड यांनी जीवाची बाजी लावत या टोळीला बेड्या ठोकल्या-
दोघांपैकी एक अल्पवयीन निसटला तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला. बचावासाठी डीसीपींनी बंदूक बाहेर काढली. त्यानंतर ही दरोडेखोराने डिसीपींवर कोयत्याने वार केला, डीसीपी पवार थोडं मागे हटले. मात्र वार चुकवू शकले नाहीत, त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला. डीसीपी पवार रक्तबंबाळ झाले. अशात त्यांनी एक गोळी झाडली, ती दरोडेखोराने चुकवली. मग एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढं आले, त्याने त्यांच्यावर ही वार केला. जराड यांच्या डाव्या खांद्यावर वार झाला. मग जखमी अवस्थेत असलेल्या डिसीपींनी दुसरी गोळी थेट पायावर झाडली, यात दरोडेखोर जमिनीवर कोसळला. मग त्याला जेरबंद करण्यात आलं, दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतलं. जवळपास वीस मिनिटं पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. डिसीपींना छातीवर पाच टाके पडलेत. ते थोडक्यात बचवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जराड यांना ही मोठा इजा झालेली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जखमी दरोडेखोरावर उपचार सुरुयेत तर अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे. डीसीपी पवार, एपीआय जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आळवल्या. दसऱ्यादिवशी याचं टोळीनं एका पोलिसाच्या घरावर दरोडा टाकत, पोलिसावर हल्ला केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात बहुळ गावात एका घरावर दरोडा टाकला, त्यावेळी त्या कुटुंबातील पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. आता पुढचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना डीसीपी पवार, एपीआय जराड यांनी जीवाची बाजी लावत या टोळीला बेड्या ठोकल्या.