देश
अंजनेरी पर्वतावर दर्शनास गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; जखमीची संख्या मोठी
हनुमान जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी विविध सोहळे सुरू असतानाच महाराष्ट्रातील नाशिकमधून एक चिंताजनक बातमी समोर आली. नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यानंतर मंदिराबाहेरच्या परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली.
मधमाशांच्या या हल्ल्यात 70 ते 80 भाविक जखमी झाले असून जखमींचा आकडा मोठा असल्याचं प्रथमदर्शनींकडून सांगण्यात येत आहे. भाविक मंदिरात दर्शनासाठी जात असचाना अचानकत मधमाशांनी हल्ला केल्यामुळं तिथं काही कळायच्या आतच प्रचंड पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं.
हनुमान जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी मोठया संख्येनं भाविक अंजनेरी पर्वतावर येतात. यंदाच्या वर्षीसुद्धा या खास दिवसानिमित्त मंदिराबाहेरील परिसरामध्ये भाविकांची ये- जा पाहायला मिळाली. त्यातच मधमाशांच्या या हल्ल्यामुळं काही काळ या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. इथं मधमाशा सैरावैरा उडू लागताच भाविकांनी लपून बसण्यासाठी आसरा शोधत काहींनी पळ काढला, तर काहींनी मिळेल त्या वस्तूनं चेहरा झाकण्याची धडपड केल्याचं पाहायाल मिळालं. जे भाविक या हल्ल्यात जखमी झाले त्यांना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं.
नाशिकमध्ये अनेक भाविकांची श्रद्धा असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीच्या निमित्तानं मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. इथं गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हनुमान मंदिरात अपेक्षित गर्दी पहाटेपासूनच झाली. पहाटेच्या वेळी पूजाविधी संपन्न झाल्यानंतर पुढे इथे जन्मोत्सवही पार पडला. ज्यानंतर मारुतीरायाच्या मूर्तीवर आभूषणांचा साज करत यथासंग नैवेद्योपचार पार पडले. दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यानं उत्सवाला गालबोट लागलं असलं तरीही आता मात्र येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे.