देश
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, जून महिन्याचे 1500 रुपये लवकरच खात्यात येणार, अजित पवार 3600 कोटींचा उल्लेख करत म्हणाले..
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी या योजनेच्या जूनच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं त्या महिलांना दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
आजचं मुख्यमंत्र्यांनी सूचना केली होती की जवळपास 3600 कोटी रुपये लाडक्या बहिणींकरता या महिन्याच्याकरता डीबीटीवर पाठवलेले आहेत, उद्या त्यांच्या खात्यावर पैसे मिळतील, तो एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (29 जून 2025) रोजी म्हटलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती
महायुतीमधील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढण्यात आला होता.
आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जातात. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. आता जून 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम महिलांना कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. जुलै ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे 16500 रुपये मिळाले आहेत. ही रक्कम ज्या महिला पहिल्या पासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळालेली असेल.
‘या’ लाडक्या बहिणींना मिळतात 500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम मिळते त्यांना योजनेच्या जीआर नुसार 500 रुपये मिळतात. शासनाचं धोरण डीबीटीवरुन एका लाभार्थ्याला एका वर्षात 18000 रुपये मिळावं हे असल्यां दोन्ही योजनांचे मिळून 12 हजार मिळतात त्यामुळं उर्वरित 6000 रुपये दरमहा 500 रुपयांप्रमाणं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा संख्या 7 ते 8 लाखांच्या दरम्यान आहे.