Menu

राजनीति
Jayant Patil Resigns: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!

nobanner

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील (Jayant Patil) पायउतार झाले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती.

मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदे पुढं म्हणाले, आणखी कुणाची नावं चर्चेत आहेत याबद्दल कल्पना नाही. मला तुमच्याकडून कळलेलं आहे. संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला काम केल, पक्ष संघटना बांधली आहे. आज पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीत संघर्षाचा काळ आहे. त्यावेळेला निश्चितपणानं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं नेतृत्व पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. जयंत पाटील यांच्या सारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही, पक्षाची बैठक आहे एवढाच निरोप आलेला आहे. निर्णय काय होईल तो होईल, पक्ष बांधण्याच्यासाठी संघर्षात आम्ही एकजुटीनं, एकोप्यानं उभं राहू, साहेबांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न 100 टक्के करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

नव्या लोकांना संधी देणार- शशिकांत शिंदे
बेरोजगारीचा प्रश्न आहे, आश्वासनं आहेत, 75 हजार नोकऱ्या लगेच देतो, निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात होईल हे लोकांना पटवून द्यायचं आहे. इनकमिंग आऊटगोईंग होत असते, नवीन लोकांना संधी देणे त्यांच्याकडन नेतृत्व उभं करणं हा साहेबांचा गुण आहे. कोण जातंय, लगेच यश मिळालं पाहिजे यापेक्षा, राजकीय सामाजिक चळवळीत लोक इच्छुक आहेत त्यांना पुढं आणलं तर महाराष्ट्रात बदल घडवण्याची क्षमता आहे. सत्ता बदलते दिसल्यावर बरेच लोक मार्ग बदलात. सध्याच्या प्रकरणांवरुन जनता नाराज आहे हे तुम्हाला दिसून येईल, असं शशिकांत शिंदे म्हणाले. मला जर संधी मिळाली तर ते भाग्य समजेन, शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांच्या सारखं काम करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात मोठं आव्हान शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आहे. युवक वर्गाचे प्रश्न आहेत. या मुद्यांवर काम करावे लागेल, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.

कोण आहेत शशिकांत शिंदे? (Who is Shashikant Shinde?)
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले. 1999 साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. शशिकांत शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला. त्यानंतर शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत. आता त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे.