Menu

देश
बाप्पाच्या स्वागतासाठी ढगांची दाटी; गणेशोत्सवादरम्यान वाढणार पावसाचा जोर, पाहा हवामान वृत्त…

nobanner

केंद्रीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश भागांमध्ये पावसानं जोर धरला असून, देशाच्या दक्षिणेकडील राज्यांपासून ते अगदी उत्तरेपर्यंत पाऊस अनेक भागांमध्ये गोंधळ उडवणार आहे. महाराष्ट्रातही चित्र वेगळं नसेल. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून, प्रामुख्यानं कोकण, मुंबई शहर आणि उपनगर या भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

गणेशोत्सवादरम्यान पावसाची हजेरी…
दक्षिण मध्य महाराष्ट्रासह उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची हजेरी असेल, तर मराठवाड्यातील दुर्गम भागांमध्येसुद्धा पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. कोकणापासून ते थेट गोव्यापर्यंत पावसाचा जोर वाढणार असून, या भागांमध्ये जोरदार सरींची हजेरी गणरायाचं स्वागत करताना दिसणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणासह मुंबई शहर, उपनगर आणि विदर्भात आकाश अंशत: ढगाळ असेल. जणू गणोशोत्सवाच्या प्रारंभी गणरायाच्या स्वागतासाठीच वरुणराजाही हजेरी लावण्यास सज्ज आहे असाच काहीसा माहोल अनेक ठिकाणी तयार झाल्याचं पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळात पुढील 24 तास पावसाची हजेरी असण्यासोबतच शुक्रवारपर्यंत हा पाऊस माघार घेणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा, कोल्हापूर, पुणे या भागांमध्ये घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी असेल.

विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया इथं मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून, मराठवाड्याच्या नांदेड आणि हिंगोली इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या यलो आणि ग्रीन असेच अलर्ट जारी असून, त्यातून पावसाचं थैमान नसणार असल्याचं स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही पावसाची संततधार मात्र तुटणार नसल्यानं अनेक कामांमध्ये अडचणी मात्र उद्भवू शकतात.