देश
गुजरातचे माजी CM रुपाणींच्या अंत्यविधींचा खर्च करण्यास भाजपचा नकार; कुटुंबावर ढकलला 25 लाखांचा भार
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अंत्ययात्रेचा खर्च उचलण्यास भारतीय जनता पक्षानं नकार दिला आहे. विजय रुपाणी भाजपचे वरिष्ठ नेते होते. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानातून ते प्रवास करत होते. या अपघातात रुपाणी यांचा मृत्यू झाला. ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत रुपाणी यांनी गुजरातचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. रुपाणी यांच्या अंत्ययात्रेचा खर्च करण्यास भाजपनं नकार दिला. या खर्चाचा सगळा बोजा भाजपकडून रुपाणी कुटुंबावर टाकण्यात आला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संतापाची भावना आहे.
१२ जूनला रुपाणी एअर इंडियाच्या विमानानं लंडनला जाण्यास निघाले होते. त्या विमानाला अपघात झाला. एका प्रवाशाचा अपवाद वगळता विमानातील सगळ्यांचा मृत्यू झाला. रुपाणी माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. मात्र आता त्यांच्या अंत्ययात्रा आणि शोकसभेवरुन वादंग माजला आहे. रुपाणी यांच्या अंत्य संस्काराशी संबंधित खर्च करण्यास भाजपनं नकार दिला. त्यामुळे हा खर्च रुपाणी कुटुंबांला करावा लागला. अंत्य यात्रेतील वाहनं, त्याची सजावट, बॅनर-पोस्टर, शोकसभा यावर २५ लाख रुपये खर्च झाला. हा सगळा खर्च रुपाणी यांच्या कुटुंबानं केला.
रुपाणी यांच्या अकाली निधनानं गुजरात शोकसागरात बुडाला. त्यांच्या कुटुंबासह भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. रुपाणी यांनी अखेरचा निरोप देण्यासाठी राजकोटमध्ये अंत्ययात्रा काढण्यात आला. श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं. रुपाणी यांचे हजारो समर्थक, भाजपचे कार्यकर्ते त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचले. मात्र आता अंत्य संस्कार आणि शोकसभेच्या खर्चावरुन वादंग उठला असून त्याला राजकीय रंग मिळाला आहे.
‘आयुष्याच्या अखेरपर्यंत माझ्या पतीनं पक्ष आणि संघटनेची सेवा केली. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रा आणि शोकसभेचा खर्च पक्ष उचलेल, असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. पक्षानं तो भार कुटुंबावर टाकला. याची अपेक्षा नव्हती. हा प्रकार अतिशय दु:खद आणि खेदजनक आहे,’ अशा शब्दांत विजय रुपाणी यांच्या पत्नी अंजली यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.
या प्रकारामुळे भाजपची गोची झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं सांगितलं आहे. रुपाणी यांचं पक्ष आणि राज्यासाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे असा वाद निर्माण होणं योग्य नसल्याचं पाटील म्हणाले. रुपाणी यांच्या अंत्ययात्रा आणि शोकसभेचा खर्च त्यांच्या कुटुंबावर का टाकला, याचं उत्तर भाजपच्या एकाही नेत्याला देता आलेलं नाही.