Menu

देश
गर्दीच गर्दी… मेट्रो-3 ने मोडला रेकॉर्ड! पहिल्या दिवसाची प्रवासी संख्या पाहून बसेल धक्का

nobanner

मुंबईकर मेट्रो-3 च्या प्रेमात पडल्याचं चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. पहिल्याच दिवशी या सेवेचा किती मुंबईकरांनी फायदा घेतलाय पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल…
‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो 3’ मार्गिका गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली असून गुरुवारी सकाळी 5.55 वाजता कफ परेडवरून पहिली मेट्रो गाडी सुटली.  
पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने मेट्रो धावणार असल्याने आणि आरे – कफ परेड दरम्यान मेट्रो प्रवास सुरू होणार असल्याने मुंबईकर उत्सुक होते.  

दिवसभर आरे – कफ परेडदरम्यानच्या प्रत्येक स्थानकांवर मोठी गर्दी होते. पूर्ण क्षमतेने मेट्रो धावू लागताच पहिल्या दिवशी मेट्रो 3 मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने विक्रम केला.  
मेट्रो 3 वरील दैनंदिन प्रवासी संख्येने गुरुवारी पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार केला. सायंकाळी सातपर्यंत या मार्गिकेवरून तब्बल एक लाख 18 हजार 286 प्रवाशांनी प्रवास केला. ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे.  

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) 33.5 किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेची बांधणी केली असून या मार्गिकेचे संचलनही एमएमआरसीकडूनच केले जाते. या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये, तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक टप्पा मे 2025 मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक – कफ परेड या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून मेट्रो 3 गुरुवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे.  

सकाळी 5.55 वाजता कफ परेड आणि आरे मेट्रो स्थानकांवरून पहिली गाडी सोडण्यात आली. गुरुवारी पहिल्यांदाच आरे – कफ परेड दरम्यान मेट्रो धावली. भुयारी मेट्रो मार्गाने पहिल्यांदाच गिरगाव, काळबादेवी, महालक्ष्मी, चर्चगेट, सीएसएमटी, विधान भवन, कफ परेड येथे जाता येत असल्याने मुंबईकरांमध्ये उत्सुकता होती.   

सकाळी गर्दीच्या वेळी अनेक मेट्रो स्थानकांवर बऱ्यापैकी गर्दी होती. दुपारी गर्दी काहीशी कमी झाली. मात्र कार्यालये सुटल्यानंतर सायंकाळी 6 पासून पुन्हा स्थानकांवर गर्दी होऊ लागली. पहिल्या दिवशी या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. मेट्रो 3 मधून गुरुवारी सायंकाळी 6 पर्यंत 97 हजार 846 प्रवाशांनी प्रवास केला.  

कार्यालये सुटल्यानंतर, सायंकाळी 6 नंतर मेट्रो प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, त्यामुळेच तासाभरातच प्रवासी संख्या थेट 21 हजारांनी वाढली. सायंकाळी 7 पर्यंत एक लाख 18 हजार 286 प्रवाशांनी प्रवास केला. ही आजपर्यंतची सर्वाधिक दैनंदिन संख्या आहे. पहिला टप्पा सुरू झाला तेव्हा 22 हजारादरम्यान दैनंदिन प्रवासी संख्या होती. तर दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या 70 हजारावर पोहोचली होती. आता आरे – कफ परेड दरम्यान संपूर्ण मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रवासी संख्या गुरुवारी सायंकाळी 7 पर्यंत 1 लाख 18 हजार 286 वर पोहोचली होती. एकूण दिवसभरामध्ये 1 लाख 56 हजार 456 प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.