देश
Farmer Loan Waiver: लोकांना कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकारमंत्र्यांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचा (Maharashtra Rains) कहर सुरू असून अनेक भागांमध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या जोर धरत आहेत. एकीकडे विरोधकांकडून सरकारवर टीका सुरू आहे, तर दुसरीकडे शेतकरीही निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आठवत सरकारला जाब विचारत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली जात असली तरी, त्याचवेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सहकार मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” असे ते म्हणाले. ते चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
Babasaheb Patil: लोकांनी काय मागायचं, हे आधी ठरवावं
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “आम्हाला निवडून यायचं असतं म्हणून निवडणुकीत काहीतरी आश्वासन द्यावंच लागतं. गावातील एखाद्याने नदी आणून द्या म्हटलं, तरी आम्ही होकार देतो. पण लोकांनी काय मागायचं, हे आधी ठरवलं पाहिजे,” असे देखील बाबासाहेब पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानावरून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाची भावना दुखावली असून, विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
Raju Shetti on Babasaheb Patil: राजू शेट्टींचा बाबासाहेब पाटलांवर हल्लाबोल
यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबासाहेब पाटील हे ग्रामीण भागातून निवडून येणारे नेते आहेत. लातूरसारख्या दुष्काळी भागातून ते येतात. तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहित आहे. बाबासाहेब पाटील यांच्यासारख्या मंत्री ज्यांच्याकडे सहकार खाते आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असे बोलत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे. मुळात शेतकरी कर्जबाजारी का झाला तर सरकारच्या धोरणामुळे झाला. शेतकऱ्याची चेष्टा करण्याच्या ऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी. केंद्र सरकारचे धोरण कुठे चुकले आहे? एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी केंद्रामध्ये जाऊन बसावे आणि तुमच्या धोरणामुळे आमचा शेतकरी कर्जबाजारी होत आहे, असे सांगावे. परंतु, ते शेतकऱ्यांची थट्टा करत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी टीका त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर केलीय.