देश
Gold Rates : सोने आणि चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, उच्चांकावरुन सोनं 2600 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरात घसरण
दिवाळी सुरु होण्यास काही दिवस बाकी असतानाच सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 2600 रुपयांनी कमी झाले. तर, चांदीच्या दरात देखील 4000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.
आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरच्या वायद्याचे सोन्याचे एका तोळ्याचे दर 120023 रुपये आहेत. 8 ऑक्टोबरला सोन्याचे दर 123677 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सोन्याचे दर 2600 रुपयांनी घसरले आहेत.
चांदीचे दर 8 ऑक्टोबरला 153388 रुपयांवर पोहोचले होते. आज चांदीचे एका किलोचे दर 149115 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच चांदीच्या दरात 4000 रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्याचे दोन दिवसांचे दर पाहिले असता दरात घसरण झाली असली तरी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात 10 ऑक्टोबरला वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 892 रुपयांनी वाढून 121385 रुपयांवर पोहोचले होते. चांदीचे दर 1277 रुपयांनी वाढून 147601 रुपयांवर पोहोचले.
सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दराची स्थिती
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 120845 रुपयांवर होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 120361 रुपयांवर पोहोचला आहे. 20 कॅरेट सोन्याचा दर 110694 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 90634 रुपये आहे.
देशातील प्रमुख शहरात सोन्याचा दर किती?
राजधानी नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 122440 रुपये प्रति तोळा आहे. अहमदाबादमध्ये सोन्याचा दर 122340 रुपये आहे. चेन्नईत 122840 आणि पाटणा येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 122340 रुपयांवर आहे.
सोने आणि चांदीमुळं गुंतवणूकदार मालामाल
2025 च्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आक्रमक धोरण राबवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादल्यानं निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक वाढवतात. बाजारातील अस्थिरतेच्या काळात सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक वाढते. याशिवाय 2025 मध्ये विविध देशांमध्ये झालेले संघर्ष यामुळं सोन्याचे दर सातत्यानं वाढत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दरात कपात करण्यात आल्यानं सोन्याला बळकटी मिळाली आहे. याशिवाय जगभरातील विविध मध्यवर्ती बँकांकडून सोने खरेदी वाढवण्यात आल्यानं सोने दर वाढले आहेत. याशिवाय भारतात सणाच्या काळात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी वाढते. सोने आणि चांदीचे दर यंदा मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.