राजनीति
Raj Thackeray MNS Meeting: न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. 1 नोव्हेंबरला विरोधक मुंबईत (Mumbai) निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीसोबतच (Mahavikas Aghadi) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) देखील सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी मोर्चा यशस्वीपणे पार पडण्यासाठी मनसेच्या नेत्यांना मार्गदर्शन दिले. बैठकीला बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते.
Raj Thackeray MNS Meeting: बैठकीत काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे, आणि हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही, तर खऱ्या मतदारांसाठी आहे. त्यांनी नेत्यांना निर्देश दिले की, “गल्ली ते दिल्ली” मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, असे त्यांनी म्हटले. याशिवाय, राज ठाकरे यांनी बैठकीत आदेश दिला की, मोर्चाचे आयोजन “न भूतो न भविष्यती” असा ठोस व प्रभावी प्रकारे करावे. राज ठाकरे यांच्या सूचनांनंतर मनसेचे नेते आणि पदाधिकारी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी जोमाने तयारी लागले आहेत.
Raj Thackeray: 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत, राज ठाकरेंचा आरोप
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुकांसाठी 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले असल्याचा गंभीर आरोप केला होता. राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये 8 ते 10 लाख, ठाण्यामध्ये 8 ते 8.5 लाख, तसेच पुणे आणि नाशिकमध्येही अशाच प्रकारे खोटे मतदार भरले गेल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी देखील केली होती. केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदेत ‘आम्हीच पाहिजे’ यासाठी हे सर्व सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला होता.