मनोरंजन
नील-रुक्मिणीच्या लग्न सोहळ्याची दणक्यात सुरुवात
बॉलिवूड अभिनेता नील आणि रुक्मिणीच्या विवाहाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ९ फेब्रुवारीला म्हणजे उद्या नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी सहाय विवाहबद्ध होणार आहेत. विवाहसोहळ्यासाठी सध्या नीलसह त्याचे वऱ्हाडी उदयपूरला पोहोचले आहेत. मंगळवारी या जोडीच्या प्री विडिंग सेलिब्रेशनला धमाकेदार सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. रेडिसन ब्लू उदयपूर पॅलेस रिसॉर्ट अॅण्ड स्पा येथे नीलच्या विवाहसोहळ्यातील मेहंदी, संगीत आणि सप्तपदीचे समारंभ पार पडणार आहेत. प्री वेडिंग कार्यक्रमांमध्ये नील आणि रुक्मिणी यांचा लूक हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असा आहे.
उद्यमपूरच्या हॉटेलमध्ये रंगलेल्या प्री विडिंग सेलिब्रेशनमध्ये ‘काला चष्मा..’ या गाण्यावर नीलने नृत्य देखील सादर केले. एवढेच नाही तर कबिला गाणे सादर करुन त्याने कार्यक्रमाची रंगत वाढविली. आपल्या लग्नाविषयी बोलताना नील म्हणाला होता की, ‘मला खूप आधीपासूनच डेस्टिनेशन वेडिंग करायचे होते. माझ्या बाबांनाही माझी ही कल्पना आवडली. त्यामुळे मग आम्ही मित्रपरिवारासह या ठिकाणी एकत्र आलो आहोत. आमचे भलेमोठे कुटुंब पाहिलं तर लग्नासाठी जवळपास ५०० लोक येण अपेक्षित आहे. त्यामुळे माझं लग्न एका भल्यामोठ्या कुटुंबाच्या सुट्टीप्रमाणेच आहे’.
गेल्या काही दिवसांपासून बी टाऊन आणि एकंदर कलाविश्वामध्ये लग्नाचे उत्साही वारे वाहत आहेत. २०१६ मध्येही काही सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या एका नव्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता अभिनेता नील नितीन मुकेशच्या नावाचाही सामवेश झाला आहे. दरम्यान या विवाहाच्या सोहळ्याची पूर्वतयारी ही शाही थाटात सुरु आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या शाही विवाहामध्ये या लग्नाची वर्णीही निश्चित लागेल.