देश
श्रीदेवीचं पार्थिव आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत मुंबई येण्याची शक्यता आहे. गेल्या 55 तासापासून श्रीदेवीचं पार्थिव दुबईमध्ये शवागारात ठेवण्यात आलं आहे. सरकारी वकिलांच्या परवानगीनंतरच श्रीदेवीचं पार्थिव मुंबईला आणता येणार आहे.
दुबई पोलिसांनी श्रीदेवीचा पती बोनी कपूर याचीही चौकशी केली. सुत्रांच्या माहितीनुसार, ही सामान्य चौकशी होती. चौकशीनंतर पोलिसांनी बोनी कपूरला सोडून दिलं. तसंच त्याच्याकडून एक अंडरटेकिंगही घेतलं गेल्याची शक्यता आहे. जेणेकरुन पोलिसांना जेव्हा गरज पडेल तेव्हा चौकशीसाठी बोनी कपूरला यावं लागेल. ज्या हॉटेलमधील रुममध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला. ती खोली पोलिसांनी सील केली आहे. तसंच पोलीस श्रीदेवीचे कॉल डिटेल्सही तपासत आहेत.
आज सकाळी 10 वाजेपर्यंत जर सरकारी वकिलांची परवानगी मिळाली तरीही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत श्रीदेवीचं पार्थिव मुंबईत येण्याची शक्यता कमीच आहे.
श्रीदेवीचं पार्थिव मुंबईत कधी येणार याचीच तिचे नातेवाईक वाट पाहत आहेत. सकाळपासून अनेकांनी त्यांच्या मुंबईतील घरी हजेरी लावली आहे. श्रीदेवीच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी येत आहेत. काल रात्री शाहरुख खानही तिथं आला होता.