देश
आजपासून पुढील स्टेशन…एल्फिन्स्टन रोड नव्हे प्रभादेवी
पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्टेशनचे अखेर नामांतर झाले असून गुरुवारपासून हे स्टेशन प्रभादेवी या नावाने ओळखले जाईल. बुधवारी मध्यरात्री शोभायात्रा काढून हा नामांतर सोहळा पार पडला.
छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात आदरार्थी ‘महाराज’ शब्दाचा समावेश करावा, या मागणीसह एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी असे नामांतर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. शिवसेनेकडून यासाठी पाठपुरावा सुरु होता. केंद्र सरकारकडून जून २०१७ मध्ये अधिसूचना काढल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात ‘महाराज’ शब्दाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, एल्फिन्स्टन रोड स्टेशनचे नामांतर झाले नव्हते. अखेर पश्चिम रेल्वेने पुन्हा एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या मंजुरीचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी रात्री स्टेशनच्या नामांतराचा सोहळा पार पडला.
शिवसेनेकडून या सोहळ्या निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. खासदार राहुल शेवाळेही या शोभायात्रेत सहभागी झाले. रात्री बाराच्या सुमारास ही शोभायात्रा एल्फिन्स्टन स्थानकावर पोहोचली. यानंतर ‘प्रभादेवी’ फलकाचे अनावरण करण्यात आले.
नामांतर कशासाठी?
मुंबई प्रेसिडन्सीचे १८५३ ते १८६० दरम्यान गव्र्हनर असलेल्या लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून स्थानकाचे नाव एल्फिन्स्टन रोड ठेवण्यात आले होते. प्रभादेवी या पुरातन देवीच्या मंदिरावरून या परिसरास प्रभादेवी म्हटले जाते. त्यामुळे इंग्रजांच्या नावावरून दिलेली स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली जात होती.