Menu

माझ्या हत्येचा कट रचला; आमदार अनिल गोटेंचा खळबळजनक आरोप

nobanner

आपल्या हत्येचा कट रचला गेल्याचे खळबळजनक विधान भाजपा आमदार अनिल गोटे यांनी केले आहे. धुळ्याच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांचा मोठा मुलगा अमोल चौधरी याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊनही काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे जर राज्यात आमदारच सुरक्षित नसतील तर सामान्य जनता कशी सुरक्षित असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

अधिवेशनादरम्यान विधानसभेत भर सभागृहात गोटे यांनी भाजपातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. आपल्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती भाजपा नेते गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे आणि जयकुमार रावल यांना होती, असे सांगताना सध्या भाजपामध्ये गुंडांना प्रवेश देण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आपल्या पत्नीबद्दल अश्लाघ्य मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या आरोपीला अटक झाली होती. त्यानंतर त्याची दुसऱ्याच दिवशी बेकायदा पद्धतीने जामीनावर सुटका झाली. या आरोपीला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सत्कार करीत पक्षात प्रवेश दिला. भाजपाने गुन्हेगारी लोकांना पक्षात आणल्यामुळे त्यांना संरक्षण मिळालं आहे. त्यामुळे वाल्याच्या टोळ्याच्या टोळ्या तुम्ही पक्षात घेत आहात, पण वालि्मिकी सापडणार कुठे? असा सवाल त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना केला आहे.

धुळ्यामध्ये महापालिका निवडणुकीत ६२ पैकी केवळ ५ लोकच मुळचे भाजपाचे सदस्य आहेत. बाकी सगळे इतर पक्षातून आयात केलेले गुंड आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत मी मुख्यमंत्र्यांना तीनदा पत्र लिहीली, त्यांना या सर्व प्रकाराची माहिती होती. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आपल्यापुढे काय वाटून ठेवलंय हे लक्षात घ्यावं असेही ते म्हणाले.

धुळे महापालिकेची जबाबदारी भाजपाने आपल्यावर न सोपवल्याने अनिल गोटे नाराज आहेत. हा वाद विकोपाला गेल्याने त्यांनी नुकतीच नव्या पक्षाची घोषणा केली. भाजपाने आपली फसवणूक केल्याचा आरोप करीत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली.



Translate »