देश
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीसाठी हानिकारक’
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीसाठी हानिकारक आहेत, दिल्लीतले लोक हेच म्हणत आहेत तुम्ही विचारू शकता असे म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या विकासासाठी जे काही होणार असेल त्यात पंतप्रधान मोदी आडकाठी करतात असाही आरोप केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा दाखल झाला आहे. याठिकाणी सगळ्याच विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. या मंचावर जाऊन भाषण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मोदी दिल्लीसाठी हानिकारक आहेत असे म्हटले आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर अनेक शेतकरी देशभरातून आले आहेत. आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे. तसेच योग्य हमीभाव दिला पाहिजे या मुख्य मागण्यांसह इतरही अनेक मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारने लवकरात लवकर लागू कराव्यात अशीही मागणी अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केली. तुम्ही शेतकऱ्यांचे हित साधले नाही तर शेतकरी तुम्हाला २०१९ ला धडा शिकवतील असाही इशारा केजरीवाल यांनी दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या टीकेला कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.