देश
मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर आता ओबीसी आरक्षणाच्या फेररचनेची मागणी
राठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिल्याने आता त्यांना कुणबी म्हणून ओबीसी कोट्यातून आणि मराठा म्हणून स्वतंत्र कोट्यातून असा आरक्षणाचा दुहेरी लाभ मिळणार आहे. यावर काही ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणामुळे ओबीसींना धोका असल्याने ओबीसी आरक्षणाची फेररचना करण्यात यावी या मागणीसाठी लातूरमध्ये या १६ संघटना एकत्र आल्या आहेत.
मराठा समाजाला एसईबीसी या विशेष प्रवर्गातून आरक्षण दिल्याने त्याचा ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होणार असल्याने समाजामध्ये भितीचे आणि संशयाचे वातावरण आहे. सरकारचा मराठा आरक्षणावरुन राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न असून ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही या संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. यावर ओबीसी संघटना एकत्र येऊन व्यापक बैठक घेऊन लढा देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यापूर्वी १९३१मध्ये देशात जातनिहाय जनगणना झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात मराठा समाज हा ३२ टक्के असल्याचे मानण्यात आले होते. यामध्ये मराठा आणि कुणबी अशा दोघांचाही समावेश होता. मात्र, सध्या कुणबी वगळून मराठा समाज ३२ टक्के असल्याचे समजून आरक्षण देण्यात आले आहे. यापूर्वीपासून कुणबींना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर ओबीसींची फेररचना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.