Menu

देश
वनक्षेत्रात भीषण आग, शेकडो हेक्टर जंगल खाक

nobanner

उपराजधानीतील अंबाझरी राखीव वनक्षेत्रात शनिवारी रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. चार तासाहून अधिक ही आग धुमसत होती. रविवारी पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत शेकडो हेक्टर जंगल जळाले असून परिसरातील राज्यशासनाच्या वृक्षलागवड मोहिमेतील रोपे जळून खाक झाली.

प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील सुमारे 750 हेक्टरचा हा परिसर आहे. पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती आणि वन्यप्राणी येथे आहेत. शनिवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास हा परिसर आगीच्या विळख्यात सापडला. या परिसरातील इमारतीत सहाव्या मजल्यावर राहणारे किरण भोंडे पाटील यांना ही आग दिसताच ते घटनास्थळी पोहोचले. दरम्यान अग्निशमन विभागाची दोन वाहने याठिकाणी पोहोचली होती. मात्र, चारही बाजूने हा परिसर बंदिस्त असल्याने आणि प्रवेशाचे मोजकेच मार्ग असल्याने या वाहनांना आत शिरता आले नाही. भोंडे यांनी त्यांना मार्ग दाखवला आणि वाहने आत गेली. तोपर्यंत आगीने बराच मोठा परिसर कवेत घेतला होता. वनखाते, पोलीस खात्यालाही त्यांनी माहिती दिली. यादरम्यान अग्निशमन विभागाची आणखी चार वाहने याठिकाणी आली. तब्बल साडेचार तास ही आग धुमसत होती. पहाटे साडेचार वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याच परिसरात राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. त्याचेही नुकसान झाले.

अंबाझरीतील या राखीव वनक्षेत्रावर अनेकांची नजर आहे. काहींना याठिकाणी जोगर्स पार्क तर काहींना बायोडायव्हर्सिटी पार्क बनवायचे आहे. व्यावसायिक वापरासाठी अनेकांचा या जमिनीवर डोळा आहे. मात्र हे राखीव जंगल असल्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे आगी लावून हे क्षेत्र बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.

आगीच्या घटनांची माहिती कळावी म्हणून प्रत्येक विभागात हाय अलर्ट कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात असलेल्या चमुच्या टॅबवर आगीचे अलर्ट येतात. त्यानंतर ज्या वनक्षेत्राला आग लागली त्यांना तातडीने कळवण्यात येते. नागपूरच्या या केंद्रात मात्र शनिवारी एका वन मजुराशिवाय कुणीही नव्हते.