Menu

देश
अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; २० लोकांचा मृत्यू

nobanner

अमेरिकेच्या टेक्सास शहरात शनिवारी एका अज्ञात हल्लेखोराने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात २० लोकांचा मृत्यू झाला. टेक्सासच्या एल पासो परिसरात वॉलमार्टमध्ये ही घटना घडली. या गोळीबारात २४ पेक्षा अधिक जण जखमीदेखील आहेत. हा हल्ला २१ वर्षीय तरुणाने केला असून सीएनएनच्या वृत्तानुसार संशयित व्यक्तीचा फोटो मिळाला आहे.

संशयित हल्लेखोर ( सौ. – सीएनएन)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या हल्ल्याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की आज एल पासो, टेक्सास येथे झालेला गोळीबार आणि हल्ला ही केवळ दुःखदायक व क्रूर घटना नसून हा एक भ्याड हल्ला होता. अशा प्रकारच्या हल्लेखोरांचा मी निषेध करतो. या हल्ल्यात जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. निष्पाप लोकांना ठार मारण्याच्या कृत्याचे समर्थन कधीही होऊ शकत नाही.

एफबीआयच्या एल पासो विभागाने नागरिकांना त्या संशयिताचा फोटो किंवा व्हिडीओ असल्यास तो एफबीआयला देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, शनिवार (विकेंड) असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. पण २१ वर्षीय संशियत हल्लेखोराने बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अनेक जणांना गोळ्या लागल्या. हल्लेखोराने काळा टी-शर्ट घातला होता आणि कानात हेडफोन घातले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. अंतर्गत दहशतवाद पसरविण्याच्या हेतूने गोळीबार करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.