देश
काँग्रेसवरील विघ्न काही सुटेना; मुंबईच्या माजी अध्यक्षांकडून भाजपाचा प्रचार
गेल्या काही महिन्यापासून काँग्रेस पक्षाला लागलेले विघ्न सुटण्याचं नावंच घेत नाहीये. आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरूपम यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता पक्षाचा राजीनामा दिलेले आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. कृपाशंकर सिंह हे अपक्ष किंवा कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवत नसले तरी त्यांनी भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे. तसंच त्यांचा जनसंपर्कही उत्तम असल्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिरा-भाईंदरचे भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचा प्रचार करण्याचा निर्णय कृपाशंकर सिंह यांनी घेतला आहे. कृपाशंकर सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाहीये. दसऱ्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात नरेंद्र मेहताही आले असल्याचं स्पष्टीकरण यानंतर त्यांच्याकडून देण्यात आलं.
काही दिवसांपूर्वीच कृपा शंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला होता. परंतु त्यानंतर त्यांनी कोणत्याही अन्य पक्षात प्रवेश केला नव्हता. आता नरेंद्र मेहतांच्या प्रचारात ते सहभागी होणार असल्याने ते भाजपामध्ये प्रवेश करतील अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनीदेखील पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.