देश
मुंबईत ‘कंटेनमेंट झोन’नंतर आता ‘सीलबंद इमारती’; पालिकेची नवी वर्गवारी
करोनाचा प्रादुर्भाव प्रभावीपणे रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंटेनमेंट झोन जाहीर केले होते. मात्र एकाच परिसरातील एकापेक्षा अधिक इमारतींना किंवा भागांना ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित केल्यामुळे पोलिसांच्या व महापालिकेच्या स्तरावर मनुष्यबळाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे मुंबईचे नवे महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी कंटेनमेंट झोन’ व्यतिरिक्त ‘सीलबंद इमारती’ ही आणखी एक वर्गवारी तयार केली आहे. या सीलबंद इमारतीत नियमांचे काटेकोरपालन करण्यासाठी सोसायटीचा सहभाग घेतला जाणार आहे. मुंबईत अशा १ हजार ११० सीलबंद इमारती असल्याचं पालिकेने जाहीर केलं आहे.
एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एखादा बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला ‘सीलबंद इमारत’ म्हणून घोषित करण्यात येईल. हे करताना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण रहात असलेल्या सदनिकेची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन सदर इमारत किंवा इमारतीचा काही भाग ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येईल. अशा इमारतीच्या / सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीस याची माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर सोसायटीतील इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, यासाठी राबवावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे देण्यात येईल. या सुधारित पुनर्रचनेनुसार महापालिका क्षेत्रात आता ६६१ ‘कंटेनमेंट झोन’ असून १ हजार ११० ‘सीलबंद इमारती’ असल्याचे घोषित करण्यात आले आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं.
सीलबंद इमारतींच्या स्तरावर करण्यात येणारी कार्यवाही ही प्रमुख्याने सोसायटी’च्या व्यवस्थापकीय समितीच्या किंवा सोसायटीने निश्चित केलेल्या सदस्यांच्या समितीच्या पुढाकाराने केली जाणार आहे. या समितीला महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी नियमितपणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. सीलबंद इमारतीसाठी निर्धारित करण्यात आलेल्या समितीद्वारे स्थानिक किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, मेडिकल दुकान इत्यादींशी संपर्क साधून सोसायटीच्या गरजांनुसार वस्तूंची वा सामानाची मागणी नोंदवली जाणार आहे. ‘ऑर्डर’ दिलेल्या सामानाची किंवा वस्तूंची ‘डिलिव्हरी’ ही सोसायटीच्या ‘एन्ट्री गेट’वर दुकानदारांद्वारे वा विक्रेत्यांद्वारे दिली जाणार आहे. त्यानंतर ऑर्डरनुसार सोसायटी सदस्याच्या दरवाज्यापर्यंत वस्तूची डिलिव्हरी करण्याची व्यवस्था ही सोसायटीच्या समितीद्वारे केली जाणार आहे.
सदर सोसायटीतील ज्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे किंवा जी व्यक्ती बाधित असून जिला लक्षणे नसल्यामुळे घरच्या घरीच ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे; अशा व्यक्तींच्या भ्रमणध्वनीमध्ये ‘ आरोग्य सेतु ॲप’ इन्स्टॉल करवून घेण्याची कार्यवाही करण्याबाबत समितीचा पुढाकार व सहकार्य अपेक्षित असेल. तसेच आवश्यकतेनुसार औषधी व सामान ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या व्यक्तींच्या घराच्या दरवाजापर्यंत वेळेवर पोहचेल याचे नियोजन आणि व्यवस्थापन संबंधित समिती सदस्यांना करावे लागणार आहे. त्याचबरोबर सदर सोसायटीतील एखाद्या व्यक्तीला ‘करोना कोविड १९’ची लक्षणे आढळून आल्यास त्याची माहिती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्याची जबाबदारी सोसायटीवर टाकण्यात आली आहे.