Menu

अपराध समाचार
रेमडिसिवीरच्या एका इंजेक्शनची ३७ हजारांना विक्री; पुण्यात चौघे अटकेत

nobanner

रेमडिसिवीर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. आरोपी हे एक इंजेक्शन ३७ हजार रूपयांना विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

राहुल बाळासाहेब वाळुंज (वय २७, रा.चाफेकर चौक, चिंचवड), रोहन बाळासाहेब वाळुंज (वय २०), प्रतिक गजानन भोर (वय २६, रा. अनुसया पार्क लेन क्रमांक पाच) आणि निकीता गोपाळ ताले (वय २५, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. औषध निरीक्षक जयश्री सवदती यांच्या तक्रारीवरून खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.

 

गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांना गोपणीय माहिती मिळाली, की खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरूव्दारासमोर एकजण जास्त दराने रेमडिसिवीर इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट दोनचे निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या मार्फत संपर्क साधला. त्यावेळी आरोपी महिलेने खडकी परिसरात इंजेक्शन घेण्यासाठी बोलविले. ती महिला एक इंजेक्शन ३७ हजार रुपयांना विक्रीसाठी घेऊन आली. त्यानुसार सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. त्या महिलेकडे अधिक तपास केला असता तिने इतर आरोप इतर आरोपींची माहिती दिली. त्यानुसार इतर तिघांना अटक केली आहे. राहुल याने त्याच्या ओळखीतून हे इंजेक्शन मिळविले होते. प्रतिक याने ते इंजेक्शन विक्रीसाठी डील केले होते. तर, आरोपी महिला ही इंजेक्शन देण्यासाठी आली होती. त्यांना हे इंजेक्शन कोठून मिळाले याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.

रेमडिसीविरची पुण्यातील सहावी कारवाई

रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. त्यानुसार आतापर्यंत पुण्यात रेमडिसीवर जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी सहा कारवाई केल्या आहेत. सहा गुन्हे दाखल करत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहेत.