देश
जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
धुळे : नजरचुकीनं एलओसी पार गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्धार, कुटुंबियांनी केला आहे.
एलओसी पार करुन चंदू पाकिस्तानात गेल्याची बातमी समजताच त्यांच्या आजीचा धक्क्यानं मृत्यू झाला. आज आजीचा दशक्रिया विधी असून, चंदू परतल्याशिवाय आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्धार, चंदूचे मोठे भाऊ आणि कुटुंबियांनी केला आहे.
नजरचुकीने एलओसी पार
27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या रात्रीतच चंदू चव्हाण हे नजरचुकीने पाकिस्तानात पोहोचल्याचं उघड झालं. खुद्द पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानेच याबाबतची माहिती ट्विट करुन दिली होती.
Pakistan Defence twit about Chandu Chavan
पाकिस्तानचा खोटारडेपणा
पाठीत खंजीर खुपसायची सवय जडलेल्या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. नजरचुकीनं नियंत्रण रेषा ओलांडून सीमेपलीकडे गेलेले चंदू चव्हाण आमच्याकडे नाही असा कांगावा आता पाकिस्ताननं सुरू केला आहे. मात्र पाकिस्तानच्या लष्करानं केलेल्या एका ट्वीटमुळं पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे.
सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे सुरु आहेत. ताब्यात घेतलेला जवान सर्जिकल स्ट्राईकमधील असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. मात्र भारताने हा दावा फेटाळला आहे. चंदू चव्हाण यांचा सर्जिकल स्ट्राईकशी संबंध नसून नगरचुकीने त्यांनी एलओसी पार केली, असं स्पष्टीकरण भारताने दिलं आहे.
कोण आहेत चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील मिलिट्रीमध्ये आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत.
धक्क्याने आजीचाही मृत्यू
चंदू चव्हाण लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचं छत्र हरवलं. त्यामुळे चंदू आणि त्याचा भाऊ भूषण यांचं पालनपोषण आजी-आजोबांनी केलं. आजी-आजोबा भूषण चव्हाण यांच्यासोबत गुजरातमधील जामनगर इथे राहतात. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं वृत्त आल्यानंतर आजीचं धक्क्याने निधन झालं