Menu

देश
गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन

nobanner

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रकल्पावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताशेरे ओढले आहेत. अलीकडे निवडणुका आल्या की, भूमीपूजन होतं. महाराष्ट्राच्या राजधानीत लोकलमध्ये लोक जीव गमावत असताना कोणाच्या तरी मनात आलं की बुलेट ट्रेन सुरु केली जाते. गुजरात निवडणूक आली म्हणून बुलेट ट्रेनचं उद्घाटन करण्यात आलं, अशी टीका त्यांनी केली. देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात ‘यशवंतराव चव्हाण: महाराष्ट्राचा आशय’ या पुस्तकाचं प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाते ते बोलत होते.
अरबी समुद्र आणि इंदू मिल याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काय झालं? असा खोचक सवाल देखील पवार यांनी यावेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हळव्या मनाचे होते. त्यांच सर्वात जास्त कुटुंबावर प्रेम होतं. जी माणस कुटुंबावर प्रेम करतात, तीच माणसं समाजावर प्रेम करू शकतात. ज्यांनी घरदार सोडलं त्यांना योग्य निर्णय घेता येत नाहीत. हे अलीकडच्या काळात दिसत आहे. महागाई एवढी वाढली असताना बुलेट ट्रेन गरजेची होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यशवंतराव चव्हाण यांनी जी धोरणं राबवली, त्यामुळे महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती झाली. त्याच धोरणाची पवारसाहेबांनी पुढे अंमलबजावणी केली. त्यामुळेच महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत पुढे होता.

देश महाराष्ट्राचं अनुकरण करायचा. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. यशवंतराव चव्हाणंच्या काळात वैचारिक मतं मांडली जायची. त्यावेळी मतभेद होते, मात्र मनभेद नव्हते. आता ती परिस्थिती राहिलेली नाही, असे पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांनी राबवलेल्या धोरणांमुळे ठराविक लोकांकडे असणारी शिक्षणाची मत्तेदारी मोडीत निघाली. बहुजन समाज शिकला. मात्र आजची तरुणाई सोशल मीडियात गुंतली आहे. त्यांनी यातून बाहेर पडून वाचन करायला हवे, असा सल्ला त्यांनी तरुणाईला दिला.