देश
विजयाचे वर्तुळ पूर्ण!
नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध सारे असे चित्र नेहमी बघायला मिळते. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली विजयाची परंपरा अशोकरावांनी महानगरपालिकेपर्यंत कायम राखली असून, विजयाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे.
नांदेड हा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा बालेकिल्ला होता. शंकररावांनंतर नांदेडची सूत्रे अशोक चव्हाण यांच्याकडे आली. अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आपले बस्तान बसविले. २६ नोव्हेंबरला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रिपद अशोकरावांकडे आले. आलेल्या संधीचा त्यांनी फायदा उठविला. मुख्यमंत्रिपदाच्या काळात नांदेडला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला. २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नांदेडला झालेल्या जाहीर सभेत पुन्हा सत्तेत आल्यावर अशोक चव्हाण यांचीच मुख्यमंत्रिपदी फेरनिवड करण्याचे संकेत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आणि त्याचा फायदा झाला होता. जिल्ह्य़ात एकहाती यश काँग्रेसला मिळाले होते.
२००९च्या निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर अशोकरावांनी नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेऊन नांदेड जिल्ह्य़ावरील पकड अधिक घट्ट केली. विभागीय आयुक्तालय प्रत्यक्षात अस्तिवात आले नसले तरी अशोक चव्हाण यांनी लातूरऐवजी नांदेडला आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, अशी भावना त्यांच्याबद्दल निर्माण झाली. ‘आदर्श’ घोटाळ्यानंतर अशोकरावांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तरीही नांदेडमध्ये अशोकरावांच्या प्रतिमेवर परिणाम झाला नाही. २०१२च्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविला होता. पण पक्ष नेतृत्वाने अशोकरावांना संधी दिली.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला असताना नांदेडमध्ये अशोक चव्हाण विजयी झाले. त्याचप्रमाणे शेजारील हिंगोली मतदारसंघात राजीव सातव यांच्या विजयात अशोकरावांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्य़ात तीन उमेदवार विजयी झाले.
वर्षभरात यश
गेल्या वर्षभरात नांदेड जिल्ह्य़ात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांनी एकहाती यश मिळविले. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अमर राजूरकर यांना विजय मिळविला. काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर झालेल्या ११ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आठ नगरपालिकांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेतही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. महानगरपालिका निवडणुकीत ८१ पैकी ७० जागाजिंकून अशोकरावांनी निर्विवाद यश मिळविले.
अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले होते. भाजपने साम-दाम साऱ्यांचा वापर केला. पण अशोक चव्हाण भाजपला पुरून उरले. २० ते २५ जागाजिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट होते. पण दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
चिखलीकर यांचे महत्त्व कमी ?
शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर-पाटील यांच्याकडे भाजपने सारी सूत्रे सोपविली होती. अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक असलेल्या चिखलीकर यांनी स्वपक्ष शिवसेनेला दूर करून भाजपला जवळ केले. २००९च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा मतदारसंघ आघाडीच्या चर्चेत राष्ट्रवादीला सोडण्यात आला होता. अशोकरावांनी हा मतदारसंघ मुद्दामहून सोडल्याची चिखलीकर यांची भावना झाली होती. तेव्हापासून चिखलीकर हे अशोकरावांना अडचणीत आणण्याची संधी सोडत नाहीत. महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाल्याने भाजपकडून महत्त्व दिले जाण्याची शक्यता नाही. यामुळेच पुढील निवडणुकीत भाजपची सहजासहजी उमेदवारी मिळणे सोपे जाणार नाही.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.