दुनिया
इंग्लंडचा भारताला दगा, स्टुडंट व्हिसा ही डोकेदुखीच
इंग्लंडमधल्या विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा यासाठी इंग्लंड सरकारने इमिग्रेशन धोरणामध्ये काही बदल केले आहेत. पण हे बदल करताना भारताला वगळल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने टिअर ४ व्हिसा कॅटेगरीमध्ये २५ देशातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे या देशातील विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी येताना व्हिसा मिळवताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंड हे देश आधीपासूनच या यादीमध्ये होते. आता या यादीत चीन, बहरीन आणि सर्बिया या देशांचा समावेश केला आहे. त्यामुळे या देशातील विद्यार्थ्यांना इंग्लंडचा व्हिसा मिळवताना कमी अडथळयांचा सामना करावा लागणार आहे. ब्रिटीश विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करताना शैक्षणिक, आर्थिक आणि इंग्लिश भाषेचे कौशल्य लागते.
६ जुलैपासून हे बदल प्रत्यक्षात येणार असून त्यामुळे यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या देशातील विद्यार्थ्यांचे इंग्लंडमध्ये येणे अधिक सोपे होणार आहे. सुधारीत यादीमधून भारताला वगळण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना कठोर तपासण्या, कागदपत्रांची पूर्तता या किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. इंग्लंडचा हा निर्णय म्हणजे भारताचा अपमान आहे असे भारतीय वंशाचे उद्योजक आणि यूकेसीआयएसए संघटनेचे अध्यक्ष लॉर्ड करन बिलमोरीया यांनी म्हटले आहे.