देश
शिवस्मारकाच्या उंचीवरुन विधानसभेत गदारोळ; मुख्यमंत्री म्हणतात, स्मारकाची उंची कमी केलेली नाही
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उंचीवरुन मंगळवारी विधानसभेत गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. तर मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेत निवेदन दिले. वाऱ्याचा वेग, लाटांची तीव्रता आणि हवा यांचा विचार करुन तज्ज्ञांनी आराखडा तयार केला असून स्मारकाची उंची कमी केलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.
राज्य सरकारने अरबी समुद्रात होणाऱ्या अश्वारुढ शिवपुतळ्याची उंची कमी करुन महाराजांच्या हातातील तलवारीची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी याचे पडसाद विधानसभेत उमटले. सरकारने शिवपुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी वेलमध्ये येऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. आमदार शशिकांत शिंदे यांनी राजदंड उचलला तर अब्दुल सत्तार आणि विजय भांबळे यांनी राजदंड पळवला.
विरोधकांचा गदारोळ सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री म्हणाले, १५ वर्ष सत्तेत असताना आघाडीचे सरकार काहीच करु शकले नाही. आम्ही सत्तेत आल्यावर शिवस्मारकाचे काम मार्गी लावले. स्मारकाचा आराखडा तत्ज्ञांनी तयार केला असून सविस्तर अभ्यास करुनच हा निर्णय घेण्यात आला. शिवस्मारकाची उंची कमी करण्यात आलेली नाही. आम्ही केलेले काम विरोधकांच्या पोटात दुखत असल्याने ते विनाकारण आरोप करत आहेत, असे त्यांनी सांगितले.