देश
‘उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा म्हणजे भाजपा-शिवसेना युतीसाठीची नौटंकी’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्यावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे इव्हेंट आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, भाजपा-शिवसेना युतीसाठी ही नौटंकी सुरु असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.
शिवसेना आणि भाजपाने सत्तेत आल्यापासून चार वर्षे एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली. पण आता निवडणुका तोंडावर आल्यामुळे एकत्र कसे यायचे त्यासाठी हा अयोध्या इव्हेंट होत आहे. अयोध्या दौऱ्यात सभा होणार नव्हती, तर मग महाराष्ट्रातून एवढे शिवसैनिक का घेऊन गेले? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.
अयोध्या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असंही इम्तियाज जलील म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले आहे. शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्याला जाणं चांगलंच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाण हे युतीसाठी पोषक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्येतील दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता हॉटेलवरुन मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा अदित्य ठाकरे यांच्यासह रामजन्मभूमीच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सहपरिवार त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. केवळ दहा मिनिटांच्या या कालावधीनंतर ते पुन्हा पंचवटी हॉटेलकडे रवाना झाले. या ठिकाणी शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत. राम मंदिराच्या निर्माणाची मागणी घेऊन विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेने अयोध्येत दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले आहेत. यापार्श्वभूमीवर शहरातील वातावरण तणावपूर्ण असून येथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.