Menu

देश
नऊ हजार खारफुटी नष्ट

nobanner

राष्ट्रीय महामार्ग ३४८ वरील कामाचा पंचनामा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राष्ट्रीय महामार्ग चारचा एक भाग असलेल्या पनवेल उरण महामार्गाला जोडणाऱ्या ३४८ मार्गाच्या विस्तारीकरणासाठी नष्ट केलेल्या खारफुटींचा पंचनामे करण्यात आला. यात रस्ता विस्तारीकरण व जेएनपीटी चार टर्मिनल्सच्या कामात नऊ हजार खारफुटी नष्ट करण्यात आल्याचे पंचनाम्यात उघड झाले आहे.

स्थानिक अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने याची तक्रार पर्यावरण संस्थांनी थेट मुख्यमंत्र्याकडे केली होती. उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदराच्या विस्तारासाठी मोठय़ा प्रमाणात भराव केला जात आहे. विद्यमान बंदरापेक्षा हे बंदर मोठे असणार आहे. त्यामुळे त्याचा विस्तारही तेवढय़ाच गतीने आणि मोठा केला जात आहे.

अहवाल शासनाकडे पाठविणार

महसूल विभागाच्या सर्कल अधिकाऱ्यांनी केलेला सर्वेक्षण अहवाल यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठविला जाणार आहे. राज्य खारफुटी नियंत्रण समिती याबाबत निर्णय घेणार आहे, मात्र न्यायालयाने एकीकडे खारफुटी तोडींवर बंदी घातली असताना या भागात सर्रास खारफुटी तोड केली जात आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून येथील राजकीय पक्ष मृग गिळून असल्याचे दिसून येते.

परदेशी पक्ष्यांची संख्या रोडावली

या दोन कामांसाठी मोठय़ा प्रमाणात भराव टाकला जात असून त्याखाली खारफुटी नष्ट केल्या जात आहेत. यामुळे या भागातील पाणथळ जमिनी नष्ट होत असून या पाणथळीवर येणारे परदेशी पक्षी येणे यंदा कमी झाले असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.