Menu

देश
राज्यभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह

nobanner

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२८ वी जयंती आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान दादर येथील चैत्यभूमीवरही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी जल्लोषात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

मुंबईमधील वरळी, दादर बीडीडी चाळींमध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. वरळी बीडीडी चाळ परिसरात महाआघाडीचे दक्षिण मुंबईमधील उमेदवार मिलिंद देवरा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. दुसरीकडे सोलापुरात रात्री १२ वाजता प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर चौकात उपस्थिती लावली. यावेळी पुष्प अर्पण करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कऱण्यात आले.

तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातून १४ एप्रिलला नियोजित मेगाब्लॉक रद्द करत असल्याची माहिती दिली. तसंच मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी घेण्यात येणारे सर्व मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. हार्बर लाइन, मेन लाइन आणि इतर ब्लॉक घेतले जाणार नाहीत. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने प्रवासांना दिलासा मिळाला आहे.