अपराध समाचार
आंतरजातीय प्रेम प्रकरणातून पुतणीवर काकाने रोखले पिस्तुल; दिली हत्येची धमकी
- 292 Views
- May 10, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on आंतरजातीय प्रेम प्रकरणातून पुतणीवर काकाने रोखले पिस्तुल; दिली हत्येची धमकी
- Edit
पुण्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या पुतणीच्या पतीवर काकाने गोळ्या झाडल्याची घटना ताजी असताना आंतरजातीय तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून चुलत्याने पुतणीच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय बंडू शेटे असं पिस्तुल रोखणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय उच्च शिक्षित तरुणीने तळेगाव एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. तरुणी पुण्यात एल.एल.बी.चे शिक्षण घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी १९ वर्षीय तरुणी ही तळेगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तेव्हा विराज मोहन अवघडे याच्याशी तिची ओळख झाली, त्याचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. त्यांचे प्रेमसंबंध हे तीन वर्षे सुरू होते. त्यानंतर १९ वर्षीय तरुणी पुणे येथे पुढील शिक्षण घेण्यास गेली. यादरम्यान, तरुणीचे आणि विराजचे प्रेमसंबंध असल्याचे फिर्यादीच्या घरच्यांना समजले. वडील आणि चुलते दत्तात्रय शेटे यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. तरुणीचे घरच्यांसोबत भांडण झाले, तिचे शिक्षणही बंद झाले. याच तणावातून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती.
काही दिवसांनी चुलते दत्तात्रय यांनी तरुणीला त्यांच्या नवलाख उंब्रे येथील राहत्या घरी आणले. तरुणीला हाताने मारहाण करत तरुणीच्या डोक्याला पिस्तुल लावून ‘तू जर विराज अवघडेसोबतचे प्रेमसंबंध तोडले नाहीस तर दोघांना जीवे मारेन’, अशी धमकी दिली. १९ वर्षीय तरुणीला घरात डांबून ठेवण्यात आले, असे तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे. कुटुंब हे तरुणीसह तिरुपती दर्शनाला जात होते. तेव्हा, विराजला एक दिवस अगोदर फोन करून दौंड येथील रेल्वे स्थानकात येऊन थांबण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी रेल्वे दौंड रेल्वे स्थनाकात येताच तरुणीने सर्वांची नजर चुकवून पळ काढला.
दोघे ही विराजच्या मामाकडे गेले, त्यावेळी विराजच्या वडिलांना तरुणीच्या नातेवाईकांनी फोन करून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे विराजचे सर्व कुटूंबच घाबरलेल्या अवस्थेत होते. तरुणीने सर्व कुटुंबाला घेऊन मुंबई गाठली. त्यांनी वकील नितीन सातपुते यांच्या मार्फत संबंधित घटने बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तरुणीला अगोदर तक्रार देण्यास सांगितली असून पुढील सुनावणी २१ मे ला होणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.