Menu

शिवसेनेचा ‘ढाण्या वाघ’! मतदानासाठी 8 वर्षांपासून करतोय ‘ब्राझील टु मुंबई’ प्रवास

nobanner

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. एकूण सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीपैकी चार टप्पे पार पडले असून अद्याप तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. यापैकी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचं मतदान नुकतंच सुरळीत पार पडलं आणि पुन्हा एकदा शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलं. शहरात राहणारे लोक मतदानाकडे पाठ फिरवत असताना परदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीने केवळ मतदानासाठी आणि आपल्या आवडत्या पक्षाला मतदान करण्यासाठी ब्राझिलहून थेट मुंबईचा प्रवास केल्याचं समोर आलं आहे. धीरज मोरे असं या व्यक्तीचं नाव असून तो कट्टर शिवसैनिक आहे.

शिवसेनेला मतदान करता यावं यासाठी धीरज मोरे यांनी सोमवारी ब्राझिलहून थेट मुंबई गाठली. केवळ शिवसेनेला मतदान करण्यासाठी इतका मोठा प्रवास करण्याची धीरज यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. गेल्या आठ वर्षांपासून महापालिका, विधानसभा, लोकसभा इतकंच नाही तर छोट्या मोठ्या निवडणुका असल्या तरीही शिवसेनेचा हा ढाण्या वाघ थेट मुंबई गाठतो.

‘भारतातील कोणत्याही निवडणुकीत येऊन मतदान करणं हा मी सन्मान समजतो. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्रत्येकाला मतदानाचा मुलभूत अधिकार मिळाला आहे . या अधिकाराचा वापर आपण आपले नेते निवडण्यासाठी नेहमीच करायला हवा’ असं धीरज मोरे मतदानाचं महत्त्व सांगताना म्हणतात.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, 21 वर्षांपूर्वी 1998 साली धीरज मुंबईहून हाँगकाँगसाठी निघाले, तेथून काही काळाने ते ब्राझिलला गेले. धीरज मोरे बहुभाषी असून त्यांना पोर्तुगाल, स्पॅनिश यासहित एकूण सहा भाषा बोलता येतात. महाड येथून धीरज मोरे यांनी मशीन ऑपरेटर म्हणून स्वतःच्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. पण कालांतराने सुपरवायझरशी धीरजचा वाद झाला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला व 1989 साली मुंबईच्या ससमिरा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर मात्र धीरज यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले, या साखळी बॉम्बस्फोटातील पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मदत करण्यास धीरज पुढे आले. त्यांनी निःस्वार्थीपणे केलेल्या मदतीबाबत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना कळलं, त्यानंतर खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना फोन करुन विचारपूस केली, कौतुक केलं आणि भेटायला बोलावलं. बाळासाहेबांसोबत झालेल्या त्या भेटीनंतर धीरज मोरे पूर्णतः कट्टर शिवसैनिक झाले. परदेशांमध्ये गाड्यांवर स्टिकर लावणं कायदेशीर गुन्हा असतानाही ब्राझीलमधील त्यांच्या गाडीवर शिवसेनेच्या ढाण्या वाघाचं चित्र लावलेलं पाहायला मिळतं. यावरुन शिवसैनिक असल्याचा त्यांना किती अभिमान आहे हे स्पष्ट होतं.

‘शिवसेनेच्या शाखेत काम करताना जात-धर्म विसरुन काम करायचो यामुळे स्वयंसेवकाप्रमाणे मी घडलो, त्याचा फायदा मला ब्राझिलमध्येही झाला. ब्राझिलमध्येही काही आंदोलनांमध्ये मी सहभागी झालो होतो’, असं धीरज सांगतात. जय महाराष्ट्र या शिवसेनेच्या लोकप्रिय घोषणोला पोर्तुगाल भाषेत ‘विवा महाराष्ट्र’ (Viva Maharashtra) म्हणतात असंही ते अभिमानाने सांगतात.

सातासमुद्रापार येऊन आपल्या पक्षप्रेमापोटी भारतात शिवसेनेला मत देण्यासाठी येणाऱ्या धिरज मोरे यांचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कुठल्याही फायद्याचा विचार न करता निस्वार्थी भावनेने शिवसेनेचा प्रचार करणाऱ्या शिवसैनिकांसाठी धीरज मोरेचं हे उदाहरण नक्कीच अभिमानास्पद आणि स्फुर्ती वाढवणारं आहे.



Translate »