देश
वरूणराजा जोरात… संपूर्ण राज्याला पावसाचा फटका
मुंबई आणि उपनगरे तसेच कल्याण, अंबरनाथ आणि वसई – विरार परिसरात पावसाने दोन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. काल सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने अद्यापही विश्राम घेतलेला नाही. त्यामुळे कुर्ला, सायन, सांताक्रूझ या परिसरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा देखील ठप्प असून पश्चिम मार्गावरील रेल्वेसेवा ठराविक अंतरापर्यंत सुरु आहेत. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सध्याही मुलुंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सायनच्या गांधी मार्केटमधील रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील अनेक ठिकाणी पोलिसांनी रस्ते वाहतूक बंद केली आहे. भिवंडीतील भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली गेल्यामुळे वालकस, बेहरे, कोशिंबी, वावेघर या चार गावातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात पावसाने जोर धरला असून सर्वत्र पावसाचा फटका बसला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
गोदावरी नदीवरील रामसेतू पुलही पाण्याखाली गेला आहे आणि रामकुंडाच्या बाहेरील रस्त्यावर पाणी येऊन पोहोचले आहे. याशिवाय परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. राज्यातील प्रमुख धरणे सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाली आहेत. साताऱ्यामधील कोयना, नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर, मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा विदर्भातील भंडारा धरणातून पाण्याचा विसर्ग आहे.
जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या भागाला समुद्राच्या उधाणाचा फटका बसला आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड या तिन्ही तालुक्यात उधाणाचे पाणी किनारपट्टीलगत सकल भागात घुसले आहे. देवगड तालुक्यातील मळई, विरवाडी, गिर्ये आणि आनंदवाडी आदी भागांत समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरले आहे. समुद्राच्या उधाणामुळे पाणी किनाऱ्यावर आणून ठेवलेल्या नौकांपर्यंत आणि मच्छिमारांच्या झोपड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मच्छिमार बांधव चिंतेत आहेत.