Menu

देश
जो निर्माण करतो त्याचे पर्व असते; मुख्यमंत्र्यांना टोला लगावत शिवसेनेकडून पवारांची पाठराखण

nobanner

‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे,’ असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी बोलताना केलं होतं. या विधानावरून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना टोला लगावत पवार यांची पाठराखण केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे.’ इथे ‘पर्व’ हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो, निर्माण करतो त्याचेच ‘पर्व’ असते व पर्व हे कधीतरी संपतच असते. बाकी सर्व ‘माजी’ ठरतात,” असा चिमटा शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना काढला.

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाजपाकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांचा समाचार घेतला. तसेच शरद पवार यांचं कौतूक केलं आहे. “महाराष्ट्रात विरोधी पक्ष आधीच गर्भगळीत होऊन पडले आहेत. काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादीतील दिग्गज नेते, विद्यमान आमदारांनी भाजपात व शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस अतिदक्षता विभागात आहे तर राष्ट्रवादी लटपटत्या पायांवर उभी आहे. शरद पवार हे महाराष्ट्र पालथा घालीत आहेत, पण उपयोग काय? त्यांची तडफ वाखाणण्यासारखी आहे इतकेच. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘शरद पवारांचे ‘पर्व’ महाराष्ट्रातून संपले आहे.’ इथे ‘पर्व’ हा शब्द त्यांनी वापरला आहे. जो काही घडवतो, निर्माण करतो त्याचेच ‘पर्व’ असते व पर्व हे कधीतरी संपतच असते. बाकी सर्व ‘माजी’ ठरतात. मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केला आहे की, ‘पवारांनी तोडफोडीचे राजकारण केले. त्याची फळे ते भोगत आहेत.’ अर्थात तोडफोडीच्या राजकारणामुळेच सध्या अनेक पक्ष तरारत आहेत हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी माणसे तोडून फोडूनच घ्यावी लागतात, हा आजवरचा इतिहास आहे,” असं सांगत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.

“राज्यातील सर्व प्रश्न सुटले आहेत. महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत,” असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावरूनही शिवसेनेने भाजपाला सुनावले आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुंबईत होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी ३७० कलम हटविण्याच्या निर्णयाचे समर्थन करत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. या निर्णयाचे देशाला आणि समाजाला कसे फायदे होणार आहेत हेदेखील सांगितले. त्याचवेळी त्यांनी फडणवीस यांना राजतिलकदेखील लावला. याआधी चंद्रकांत पाटलांचे असे म्हणणे होते की, निवडून आलेले आमदार नेता निवडतील व दिल्लीश्वरांच्या आदेशाने जे व्हायचे ते होईल. ते आता होणार नाही. महाराष्ट्रात यावेळी पाऊस चांगला झाला आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे. कुठे पूर तर कुठे होरपळ आहे, पण चंद्रकांत पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले की,देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याही पक्षाने दाखवला नव्हता. ही ऊर्जा, हा आत्मविश्वास ज्यांच्यापाशी आहे त्यांच्यासाठी विजयाचा मार्ग सुकरच होत असतो. भाजपकडे हा आत्मविश्वास आहे असेच एकंदरीत वातावरण दिसते. त्याचा आम्हाला आनंदच आहे,” असं सांगत “पण हे सर्व केले तरी लोकांचे प्रश्न सुटायला हवेत. ते खरेच सुटले असतील तर युतीला २५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील,” असा प्रश्नचिन्हही भाजपाच्या दाव्यावर उपस्थित केला.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.